Thu, Jul 18, 2019 17:07होमपेज › Satara › प्रेमप्रकरणाच्या संशयावरून अभेपुरी येथील तरुणाचा खून

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून अभेपुरी येथील तरुणाचा खून

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:26PMवाई : प्रतिनिधी

अभेपुरी, ता. वाई येथील अरुण नामदेव मोहिते (वय 21) या युवकाचा प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मित्रानेच खून केल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी याप्रकरणी रूपेश ऊर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (वय 24, रा. अभेपुरी) याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मृत अरुण मोहिते हा दि. 23 पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ अक्षय नामदेव मोहिते याने वाई पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामध्ये त्याने अरुण हा त्याचा मित्र रूपेश याच्याबरोबर घरातून वाईला काम बघण्यासाठी गेला होता. मात्र, तो घरी परत आला नसल्याचे तक्रारीत म्हटले होते. याबाबत पोलिसांनी रूपेशकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपास करीत असताना बुधवारी मालकमपेठ-पसरणीजवळ धोम उजव्या कालव्यात एक युवक मृतावस्थेत वाहून जात असल्याचे दिसून आल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

घटनास्थळी जाऊन पोलिसांनी संबंधित मृतदेह बाहेर काढला व मृताची ओळख पटवण्यासाठी अक्षय मोहिते यास त्याठिकाणी बोलावले. यावेळी तो माझा भाऊ असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मृत अरुण याच्या डोक्यात गंभीर घाव झाल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून मृत अरुण याचा खून झाल्याची तक्रार अक्षय मोहिते याने दिल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता रुपेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. मृत अरुण याचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून रुपेशने त्याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने अरुण याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

अधिक तपास पोलिस उपअधिक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन येडगे करीत आहेत.