Tue, Jun 25, 2019 21:32होमपेज › Satara › क्रांतीदिनी जिल्ह्यात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

क्रांतीदिनी जिल्ह्यात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:35PMसातारा : प्रतिनिधी

मराठा समाजाला तातडीने आरक्षण  मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी  क्रांतीदिनी म्हणजे दि. 9 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील 11 ही तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालयांसमोर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यात टाळाटाळ केली जात असल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने निषेध व्यक्‍त केला असून ऑगस्ट क्रांतीदिनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. पुण्यात झालेल्या आरक्षण परिषदेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी आरक्षणाबाबत विधाने केली असली, तरी लेखी स्वरूपात अद्याप काहीही दिलेले नाही. त्यामुळे ऑगस्ट क्रांतीदिनी आंदोलन छेडण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने कायम ठेवला आहे.

याच धोरणाचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यात सातारा तालुका वगळता सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर ऑगस्ट क्रांतीदिनी ठिय्या आंदोलन केले जाईल. 11 ते 3 या वेळेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन दिले जाईल. शासनाच्या कृतीचा निषेध करून  आंदोलन शांततेत करण्यात येईल. सातारा शहर व सातारा तालुक्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. सातारा शासकीय विश्रामगृहावर समन्वयकांच्या बैठकीत सर्वमताने आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल मराठा समाजाने आपापल्या भागातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनात सामील व्हावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तालुका पातळीवरील आंदोलनांची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील समन्वयकांनी घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. 

सातारा शहर व सातारा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सामील व्हावे, ठिय्या आंदोलन करुन शासनाला आपल्या मागण्यांविषयीची जाणीव करुन द्यावी, असे यावेळी ठरवण्यात आले.