फलटण : प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चा आणि धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी येथील अधिकारगृह इमारतीसमोर 2 वेगवेगळ्या शामियान्यांत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे. मराठा आणि धनगर समाजबांधवांचे आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन जोशपूर्ण वातावरणात सुरू असून आरक्षण घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दोन्ही समाजांच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
गेली सुमारे सप्ताहभर फलटणमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून फलटण बंद यशस्वी केल्यानंतर दि. 26 जुलैपासून गेली 7 दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात दररोज 6/7 गावांतील स्त्री-पुरुष आणि तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असून गावागावांतून आलेले लोक मिरवणुकीने आंदोलनस्थळी येऊन ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही,’ अशा घोषणा देत आंदोलनात सक्रिय होताना दिसत आहेत. विविध संस्था/संघटनांचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आंदोलनस्थळी भेट देवून आपला पाठींबा व्यक्त करीत आहेत.
धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे, या मागणीसाठी रविवारपासून सुरु असलेले धरणे आंदोलन दररोज विविध गावातील स्त्री/पुरुष आणि तरुण वर्गाच्या सहभागाने व्याप्ती वाढवत असताना बुधवारी सकाळी कोळकी, बरड, राजुरी, कुरवली येथील ग्रामस्थांनी तसेच भाजपा युवा नेते सह्याद्री कदम, अ.भा. सनगर समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत राऊत, विजय मायणे, आनंदराव नवाळे, अमोल राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत नाळे, पराग भोईटे व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलनस्थळी येवून धनगर समाज बांधवांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.
दोन्ही ठिकाणच्या आंदोलनात भजन, किर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याने परिसराला एक वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत विविध भागातील तरुणांनी दिलेले बलिदान यासंबंधी सर्वांना माहिती देवून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच आंदोलनस्थळी नामवंत वक्त्यांची भाषणे घेवून समाजबांधवांना आरक्षणाविषयी अवगत केले जात आहे. दरम्यान आंदोलनस्थळी गेली सप्ताहभर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बुधवारपासून बंदोबस्तात वाढ करताना एसआरपीचा समावेश करण्यात आला आहे.