Sat, Jan 19, 2019 09:38होमपेज › Satara › ‘शिवराष्ट्र’ची शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

‘शिवराष्ट्र’ची शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 23 2018 11:43PMसातारा : प्रतिनिधी

शिवजयंती विधायक उपक्रमांनी साजरी व्हावी, या उद्देशाने शिवराष्ट्र हायकर्स-महाराष्ट्र संस्थेने सातारा जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन कृतिशिलता दाखवली. जलमंदिर येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ही मदत सुपूर्द करण्यात आली. 

15 मराठा लाईट इन्फट्रीचे जवान दीपक जगन्नाथ घाडगे (रा. फत्यापूर, पो. कामेरी, ता. जि. सातारा) हे ऑपरेशन रक्षक, कृष्णा घाटी सेक्टर, पूंछ, जम्मू - काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना अतिरेक्यांनी बेछुट फायरिंग केले होते. त्याला प्रत्युत्तर देत असताना दिपक घाडगे यांना वीरगती प्राप्त झाली होती.  तर सिग्नल रेकॉर्डस युनिटमधील नाईक दत्तात्रय महादेव राऊत (रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे टी. एस. कंपनी (1 टी.टी.आर. जबलपूर, मध्यप्रदेश) येथे सेवा बजावत असताना दि. 30 जानेवारी 2000 पासून मिसिंग आहेत. 

‘शिवराष्ट्र’च्यावतीने दीपक घाडगे यांची पत्नी निशा व दत्तात्रय राऊत यांची आई तारुबाई यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत व शिवप्रतिमा देण्यात आली. तसेच यावेळी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेच्या लोगोचे खा. श्री.  छ. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व ‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे, ‘शिवराष्ट्र’चे सदस्य सूर्यकांत घाटगे, राहुल धर्माधिकारी, संदिप कणसे, महेश पाटील, विक्रमसिंह घाटगे, रोहित बडिगेर, सुनील काटकर, सौ. गीतांजली कदम, सौ. रंजना रावत यांची प्रमुख उपस्थिती होती.  संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी प्रास्तविकात शिवजयंती उपक्रमाविषयी माहिती दिली. 

‘शिवराष्ट्र’चे कार्य अभिमानास्पद : उदयनराजे

शहिद जवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासारखे पुण्य नाही. हे पुण्य माझ्या हातून घडवणार्‍या शिवराष्ट्रचे कार्य अभिमानास्पद आहे, असे गौरवोद‍्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले. शिवराष्ट्रच्या कामाची माहिती घेऊन या कामाला भविष्यातही माझे सहकार्य असेल, असेही खा. उदयनराजे म्हणाले.