Tue, Jun 02, 2020 19:02होमपेज › Satara › दारु विक्रेत्यांकडून शक्‍कल : थर्टीफर्स्टमुळे मद्यपींची चंगळ

मद्य परवाना अवघ्या ५ रुपयात

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:40PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी आणि बाळगण्यासाठी तळीरामांना परवाना आवश्यक असतो. यामधून पळवाट काढण्यासाठी 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरात अनेक दारू विक्रेत्यांनी ग्राहकांना दारूच्या बाटलीसोबत अवघ्या 5 रुपयांमध्ये एक दिवसाचा मद्य परवाना दिला. त्यामध्येही भानगडी करत काही विक्रेत्यांनी तारीख न टाकताच हा  परवाना दिल्याचे उघड झाले. 

नव वर्षाच्या स्वागतासाठी काही दिवसांपासून सातारा शहर व परिसरात अनेक ठिकाणी बेत आखले गेले होते. यामध्ये 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी मटणासह दारूची आवड असणार्‍यांची संख्या मोठी होती. मद्यपान केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईच्या भीतीपोटी अनेकांनी आपला कार्यक्रम गुपचूप उरकला तर अनेकांनी खुलेआम मद्यपान केले. मात्र, खुले आम मद्यपान करणार्‍यांना शासनाच्या नियमाप्रमाणे संबंधिताला परवाना आवश्यक असतो.

परंतु, सातारा शहरात 3-4  दिवसांमध्ये दारू विक्रेत्यांनी याच परवान्याचा खेळ चालवला. विक्रेत्यांकडून ग्राहकांना अवघ्या 5 रूपयात परवाना देण्यात आला. हा परवाना जरी नियमानुसार देण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी त्या परवान्यावर संबंधित दिवसाची तारीख न टाकताच या परवान्याचे वाटप केले होते. यामुळे आपला व्यवसायही तेजीत चालेल आणि ग्राहकांवर पोलिस कारवाईही होणार नाही, असा हेतू विक्रेत्यांनी ठेवला होता.

याबरोबरच काही दुकानदार या तळीराम ग्राहकांना पोलीस तुम्हाला पकडतील तेव्हा तुम्ही त्या दिवसाची तारीख टाका असा सल्ला देत असल्याचे दिसून येत होते. या परवान्यांचे वितरण काही दिवसांपासून सातारा शहरातील दारू दुकानातून होत असल्याचे दिसून आले.