Mon, Apr 22, 2019 16:23होमपेज › Satara › राज्यातील ग्रंथपाल ग्रंथमित्र पुरस्कार परत करणार

राज्यातील ग्रंथपाल ग्रंथमित्र पुरस्कार परत करणार

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:38PMसातारा : प्रतिनिधी

शासनाने गाव तेथे ग्रंथालय ही अभिनव संकल्पना घोषित केली. मात्र, ग्रंथालय चालवणार्‍या  ग्रंथपाल आणि  कर्मचार्‍यांची हेळसांड थांबविण्यासाठी आश्‍वासनाच्या पलिकडे काही केले नाही. त्यामुळे उपाशी पोटी क्रांती करण्याचे पोकळ आश्‍वासन देवून शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाने दिलेले ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा निर्णय सातार्‍यात झालेल्या बैठकीत सौ.नंदा जाधव, प्रा. संभाजीराव पाटणे, डी.डी.थोरात, सौ. वर्षा कोडगुले, संजय जंगम यांनी जाहीर केला.

सातारा जिल्ह्यात सुमारे 35 ग्रंथालये असून राज्यातील  आकडेवारी मोठी आहे. ग्रंथालयामध्ये अ.ब.क.ड. अशी वर्गवारी असून सन 2012 व 13 सालच्या आधी शासनाने ग्रंथालयांना 100 टक्के अनुदान दिले त्यानंतर 50 टक्के अनुदानात वाढ केली.गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना सुरू केली पण, ड वर्गातील कर्मचार्‍यांला 1200 ते 1500 रुपये इतक्या तुटपुंज्या  मानधनावर 6 ते 7 तास  सकाळ -संध्याकाळ  काम करावे लागत असून अशा कर्मचार्‍यांची आवश्यकता वेठबिगार्‍यासारखी झाली आहे. तुटपुंजे अनुदान ग्रंथालयाला पूर्वी दोन हप्त्यात मिळत होते.

मात्र, आता 50 टक्के अनुदान वाढ करून तेही वेळेवर मिळत नसल्याने ग्रंथालये चालवायची कशी? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.पुस्तकांचे गाव निर्माण करणार्‍या  शासनाला ई ग्रंथालय निर्माण करता आलेली नाहीत. ग्रंथालयात संगणक असून ते बहुतांशी देणगीदाराने दिलेले आहेत. तरी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण शासन देत नाही. शासनाने शाश्‍वत सुविधा देण्याचे मान्य केले असले तरी किमान आधारभूत वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची तरतूद करावी, अशा मूलभूत मागण्या शासन दरबारी प्रलंबीत आहेत. त्यामुळे राज्य पातळीवर वारंवार मोर्चे, आंदोलने  करून शासनाच्या निदर्शनास हे प्रश्‍न आणून दिले तरी काही विधायक निर्णय होत नसल्याने अखेर ग्रंथमित्र पुरस्कार शासनाला परत करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याचे जिल्ह्यातील ग्रंथपालांच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

यावेळी रूपाली मुळे, विष्णू धावडे, संजय इंगवले, महादेव जंगम, राजेंद्र माने, संतोष लाड, बाबासाहेब बागडे, रूपाली पडवळ, जास्मीन शिकलगार, मंगल जंगम, ग्रंथपाल व कर्मचारी उपस्थित होते.