Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Satara › सातारा : मुलाच्‍या हल्ल्यात जखमी आईचा मृत्यू 

सातारा : मुलाच्‍या हल्ल्यात जखमी आईचा मृत्यू 

Published On: Jul 08 2018 1:43PM | Last Updated: Jul 08 2018 2:05PMसातारा : प्रतिनिधी

वराडे (ता. कराड, जि. सातारा)   येथे २९ जूनला रात्री मुलाकडून झालेल्‍या  चाकू हल्ल्यात कल्पना सदाशिव घोरपडे (वय ६०) यांचा शनिवारी रात्री अकराव्या दिवशी उपचारावेळी मलकापूर (कराड) येथील कृष्णा रूग्णालयात मृत्यू झाला. घटनेदिवशी संशयित सागर घोरपडे याने केलेल्या हल्ल्यात त्याची पत्नी मोहिनी घोरपडे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. दरम्यान, संशयित सागर घोरपडे याच्यावर अजूनही कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वराडे येथे संशयित सागर घोरपडे याने आई कल्पना घोरपडे यांच्यासह पत्नी मोहिनी घोरपडे यांच्यावर आपल्या घरात चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर जखमी पत्नी मोहिनी घोरपडे यांचा रूग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर कल्पना घोरपडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेरपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणाच झाली नाही आणि शनिवारी मध्यरात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दरम्यान, संशयित सागर घोरपडे याच्यावर अजूनही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे क्रूर हत्याकांड कौटुंबिक वादाच्या कारणावरूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.