Mon, May 27, 2019 06:56होमपेज › Satara › धूमबाईकची स्टाईल...होतेय काळजात धस्स!

धूमबाईकची स्टाईल...होतेय काळजात धस्स!

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 8:10PMसातारा: प्रतिनिधी

कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनीप्रदूषणाबरोबरच अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असून ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या मानसिक स्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. बेदरकार दुचाकी चालविणार्‍या स्टंटबाज युवकांमुळे त्यात आणखी भर पडत असल्याने हुल्लडबाज तरुणाईला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान धुमबाईकच्या या वेगाने आणि स्टाईलने अनेकांच्या काळजात धस्स होत असून हॉर्नचा कर्कशपणा करतोय माणसांची मतिगुंग असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

रस्त्यावरुन एकाग्रपणे वाहन चालविताना अचानक प्रेशर हॉर्न वाजण्यामुळे बिचकल्यासारखे होते. आपले काही चुकले नाही ना यासाठी पुढचा वाहनचालक दुचाकी वेगात असतानाही  मागेपुढे  पाहतो. या काळात लक्ष विचलित झाल्यामुळे  रस्त्यांच्या परिस्थितीकडे, दुचाकीच्या वेगाकडे दुर्लक्ष होते. तोल जाण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे चित्र आहे.  हुल्लडबाजी आणि आपल्याकडे लक्ष जावे यासाठीच युवकांकडून होणार्‍या हॉर्नच्या कर्णकर्कशतेमुळे मानसिक स्थितीवरही परिणाम होत असतो. कर्णकर्कश हॉर्नमुळे होणार्‍या दुष्परिणामांची जाणीव असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी मागे ‘नो  हॉर्न’ प्रबोधन मोहीम राबविली. शाळा, महाविद्यालयांतून तसेच चालक परवाना देताना या बाबतचे प्रबोधन करण्यात आले  होते.  पण, पुढे येरे माझ्या मागल्या, अशीच गत झाली.

अलिकडे तर रॉयल इनफिल्डने एक भारदास्तपणा येत असल्याने या दुचाकी बेफाम चालविण्याकडे युवकांचा कल वाढत असून मध्यंतरी एकाचा प्राणही या धुम बाईकमुळे जाण्याचा प्रकार घडला आहे.
तरुणाईच्या हुल्लडबाजीतून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईची भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

अत्याधुनिक बाईकही वेगवान...

विविध कंपन्यांच्या येणार्‍या आधुनिक बाईक युवकांचे वाढते आकर्षण बनत असून वेगात चालविण्यासाठी या बाईकही तशाच बनवल्या जातात. असे असले तरी तरूणाईच्या बेफिकीर वृत्तीकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. दुचाकीला हॉर्न कसा आहे? तो कसा वाजतो याकडे पालकांनी आवर्जून लक्ष दिले पाहिजे. दुचाकी चालविण्यातील धांदरटपणा मुलांच्या जीवावर बेतत असल्याचे अनेक अपघातांतून समोर आले आहे. यासाठी घरातून मुलांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.