Tue, Jul 16, 2019 22:38होमपेज › Satara › शेतकरी प्रचंड वैतागले : संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यात

कृषी अधीक्षक बोरकर कुठे असतात?

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक सुनील बोरकर कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. विविध कार्यक्रम, कार्यशाळा, बैठका यांमुळे गेल्या पंधरा-वीस दिवसांत बोरकर यांच्या व्यग्र असण्याचे प्रमाण एवढे वाढले की त्यांच्या वाहनाचे लॉगबुक दाखवा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होऊ लागली आहे. बोरकर कार्यालयात उपलब्ध न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

सातार्‍याच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तिथल्या कारभार्‍यांमुळे सातत्याने चर्चेत येऊ लागले आहे. तीन-चार महिन्यांनी या विभागाला नवे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले. सुनील बोरकर यांची पुण्याहून सातार्‍याला बदली झाली. कारभारात सुसूत्रपणा येणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येऊ लागला.  कृषी उपसंचालक गुरुदत्त काळे यांच्या बदलीनंतर कार्यालयात फारच विस्कळीतपणा आला. जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातच अनागोंदी वाढली आहे. खातेप्रमुखच जाग्यावर उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांची कामे रखडत आहेत. शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध होत नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येऊ लागला आहे.

सुनील बोरकर यांचे कार्यालयात उपस्थित राहण्याचे प्रमाण अगदीच रोडावले आहे. कार्यालयात आहेत असे समजल्यावर त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते कुठल्यातरी तालुक्यात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयात मिळते. त्यांची वेळ घेवून येण्याचा प्रयत्न करुनही ते कार्यालयात उपलब्ध होत नाहीत. मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही प्रतिसाद मिळत नाही. सतत पुणे, मुुंबई, कोल्हापूरला बैठका असल्याची कॅसेट त्यांच्या कार्यालयात ऐकवली जाते. कधी कार्यालयात उपलब्ध असले तर त्यांच्या दालनात अधिकार्‍यांसह इतरांच्या बैठका सुरु असतात. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

शेतकरी वैतागले असून बोरकरसाहेब खरंच इतके व्यस्त आहेत का, याची माहिती घेण्यासाठी काही शेतकर्‍यांनी बोरकरांच्या वाहनाच्या लॉगबुकची मागणी केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील माण, पाटण, महाबळेश्‍वर अशा दुर्गम भागातून शेतकरी भेटायला येतात. मात्र, विभागाचे प्रमुखच जागेवर नसल्याने त्यांना निराश होवून  परतावे लागते. त्यामुळे बोरकर यांच्या कार्यपध्दतीवर शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध  न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.