Fri, Jul 19, 2019 01:02होमपेज › Satara › राज्यातील पहिल्या मेगा फूड पार्कचे आज उद्घाटन 

राज्यातील पहिल्या मेगा फूड पार्कचे आज उद्घाटन 

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील पहिल्या मेगा फूड पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या महाराष्ट्रातील पहिल्या सातारा मेगा फूड पार्कचे उद्घाटन गुरुवार, दि. 1 मार्च रोजी केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योगमंत्री ना. हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते, तसेच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस  व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

सातारा मेगा फूड पार्कचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक, तसेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड व उमेश माने यांनी याबाबत दिलेली माहिती अशी, बीव्हीजी अर्थात भारत विकास ग्रुपने या प्रकल्पाला चालना दिली असून या महाराष्ट्रातील पहिल्या सातारा मेगा फूड पार्कचे उद्घाटन गुरुवारी दुपारी 2 वा.  देगाव, सातारा येथे होणार आहे. पुण्यापासून अवघ्या 118 कि.मी.वर हा महाप्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. एकाच वेळी शेतकरी आणि ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांचे उत्पन्‍न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा मेगा फूड पार्क म्हणजे 140 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला एक भव्य प्रकल्प आहे. याद्वारे शेतीमालावर प्रक्रिया करून तो निर्यात करता येणार आहे. 

साधनसामग्रीअभावी लागणार्‍या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 24 तास वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या    आहेत. तसेच उद्योगाची वाढ म्हणजे पर्यावरणाचा  र्‍हास या समीकरणाला छेद देत याठिकाणी पर्यावरणाला प्राधान्य देण्यात आले असून यातील प्रत्येक घटकाचा पुनर्वापर (रियूज) आणि पुनर्निमिती (रिसायकल) यासाठी झिरो डिस्चार्ज प्‍लॅन्ट तयार करण्यात आले असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.