Sun, Jul 21, 2019 16:25
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › देवदर्शनाहून परतताना अपघातात माजी झेडपी सदस्यांचे पती ठार

देवदर्शनाहून परतताना अपघातात माजी झेडपी सदस्यांचे पती ठार

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 11:24PMओझर्डे : वार्ताहर 

सातारा-पुणे महामार्गावर बोपेगाव फाट्यावर झालेल्या अपघातात साखरवाडीच्या माजी जि. प. सदस्या रूपाली सरगर यांचे पती लक्ष्मण सरगर ठार झाले असून त्याही गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मण सूर्यकांत सरगर (वय 50), पत्नी रूपाली सरगर (42, रा. साखरवाडी, ता. फलटण) हे मंगळवारी जावली तालुक्यातील कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या कुसुंबी गावच्या काळुबाईच्या दर्शनासाठी गेले होते. तेथील देवदर्शन आटोपून ते पुन्हा मेढा कुडाळ पाचवडमार्गे पुढे सातारा पुणे महामार्गावरून खंडाळाकडे जात असताना त्यांच्या ओमनी (क्र. एम एच 13 एन 6782) ने बोपेगाव फाट्यावर समोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पो (क्र एम एच 14 जी यु 0452) ला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चालक व मालक असलेले लक्ष्मण सूर्यकांत सरगर व त्यांच्या पत्नी रूपाली सरगर या गंभीर झाल्या. ते दोघेही चालक केबीनमध्ये अडकले. ही घटना भुईंज पोलिसांना कळविण्यात आली. 

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच हवालदार मुंगसे हे तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी सरगर पती पत्नीला कारमधून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. पुढे उपचारा दरम्यान, लक्ष्मण सरगर यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या पत्नी रुपाली यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद भुइर्ंज पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार मुंगशे करीत आहेत.