होमपेज › Satara › सातार्‍यात आर्थिक दुर्बलांसाठी होणार वसतिगृह

सातार्‍यात आर्थिक दुर्बलांसाठी होणार वसतिगृह

Published On: Sep 06 2018 1:58AM | Last Updated: Sep 05 2018 8:47PMसातारा : प्रतिनिधी

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्‍ता योजनेंतर्गत आर्थिकदृषट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाच्या सुविधा सातार्‍यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सातार्‍यातील गोडोलीत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा तसेच उपाययोजना करण्यात येत आहेत. या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याचा उपयोग आर्थिकदृष्ट्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.

राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवून देतानाच आदिवासी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय तसेच खुला प्रवर्ग अशा समाजातील सर्वच घटकाला शिक्षणासाठी सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतमजुरांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी दरमहा दोन हजार ते तीन हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेेल्या सवलती आता वार्षिक सहा लाख उत्पन्न असणार्‍या पालकांच्या मललांनाही मिळणार आहेत. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी राहण्याची सोय करण्याचा राज्य सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह स्थापन करण्यात येत आहे.  शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह) आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना या वसतिगृहाची सवलत मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी अथवा नोंदणीकृत मजूर आहेत, अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना मोलाची ठरणार आहे. या योजनेत शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळणार आहे. मात्र, सातार्‍यातील गोडोली पशुसंवर्धन विभागाच्या इमातीत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरु करण्यात येत आहे. हे वसतिगृह सर्व सोयींनीयुक्‍त असे असेल. या वसतिगृहात प्रवेश घ्यासाठी आवश्यक असणारे अर्ज गर्व्हमेंट पॉलिटेक्नीक, कराड येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

शासनाच्या वेबसाईटवरुनही हे अर्ज भरता येणार आहेत. या वसतिगृहाची तूर्त क्षमता 50 विद्यार्थ्यांची आहे. प्रवेशाच्या तुलनेत  ही क्षमता आणखी वाढवण्यात येणार आहे. हे वसतिगृह कंत्रादपध्दतीने चालवायला देण्यात येणार असून त्यावर प्रत्येक विद्यार्थ्यामागे 800 रुपये शासन खर्च करणार आहे.  संबंधित विद्यार्थी राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थी व पालकाचे मिळून 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असावे. शासनाच्या प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असेल. 

प्रवेश घेतलेली संस्था शहर किंवा त्याच गावात असल्यास वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. समांतर अभ्यासक्रास प्रवेश घेतला असल्यास वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही.पीएच. डी.  करण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षे वसतिगृहात रहात येईल. असे विद्यार्थी वगळून वसतिगृहातील प्रवेश 16 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांनाच राहिल. प्रवेशावेळी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी जिल्हापातळीवर वसतिगृह सुरु करण्याचा महत्वपूर्व निर्णय घेतला.   जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभा घ्यावा. - सचिन बारवकर निवासी उपजिल्हाधिकारी