Wed, Apr 24, 2019 21:49होमपेज › Satara › कोळे दिंडीचा इतिहास १६० वर्षांचा 

कोळे दिंडीचा इतिहास १६० वर्षांचा 

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:23PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण 

पंढरीच्या विठ्ठलाचे सिद्धहस्त परम भक्‍त आणि  कर्जतचे ( जि. अहमदनगर) महान संत श्री गोदडनाथ महाराजांचे पट्टशिष्य असलेल्या कोळे, ता. कराड येथील निवासी श्रीसंत घाडगेनाथ महाराज उर्फ घाडगेबुवा यांनी विठ्ठलावरील निस्सीम भक्‍तीप्रेमातून साधारण 1856/57 साली म्हणजे जवळ जवळ 160 वर्षापूर्वी कोळे येथून सुरू केलेला श्री. संत घाडगेनाथ महाराज पायदिंडी पालखी सोहळा शेकडो भाविक भक्‍तांसह विठ्ठल नामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या निनादात अव्याहत 160 वर्षांपासून सुरू आहे. दिंडीचालक म्हणून सध्या कृष्णत व ज्ञानदेव नामदेव शिंदे बंधू काम पाहतात.

घाडगेबुवा श्रीसंत गोदडनाथ महाराजांच्या सानिध्यात आले, तेंव्हा श्रीसंत गोदडनाथांचा विठ्ठलांशी थेट संवाद होत असतो असे त्या काळात समजले जात होते. त्याकाळी पंधरवड्याची वारी करणारे कुणी नव्हते म्हणून त्याच गोदडनाथांकडे प्रत्यक्ष विठ्ठलाने तुझ्या परमशिष्यांपैकी  पंधरवड्याची दशमीची वारी करणारा एक भक्‍त दे अशी मागणी केली व श्री संत गोदडनाथ महाराजांनी तसा भक्‍त दिला तेच  घाडगेबुवा होत,अशी अख्ख्यायिका आहे. आज श्रीसंत घाडगेनाथ महाराज म्हणून त्यांची ओळख आहे.

घाडगे हे मुळचे कुठरे, ता. पाटणचे रहिवासी, गरिबीमुळे कर्जबाजारी झाल्यावर कोळे येथील सावकाराकडे चाकरीला आले. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना कोल्हापूर संस्थानच्या शाहु महाराजांच्या सेवेत पाठविले.तिथेही त्यांच्या निष्ठेवर खुष होऊन महाराजांनी त्यांना आपल्या खासगी सेवकामध्ये घेतले, शाहू महाराज विठ्ठल भक्‍त होते. त्यांनी पंढरपुरला विठ्ठल दर्शनासाठी जाताना घाडगे यांना बरोबर नेले. ही विठ्ठलाची व त्यांची पहिली भेट होती.

त्यांना हा नवसाला पावणारा देव आहे, असे सांगण्यात आले. तेंव्हा त्यांनी विठ्ठलाला माझे कर्जफिटू दे तुझी महिन्याची वारी करीन असा नवस बोलला व विठ्ठलाची महिन्याची वारी धरली. परत येताना माण तालुक्यातील धुळदेव येथे श्रीसंत गोदडनाथ महाराज यांची व शाहु महाराजांची भेट झाली तेेव्हा त्यांनी घाडगे यांच्यातला निष्ठावान भक्‍त हेरून त्यांना दीक्षा दिली, तेव्हा ते घाडगेबुवा झाले. त्यांनी काही वर्षे महिन्याची वारी केली पुढे देवाने गोदडनाथांच्याकडे व्यक्‍त  केलेल्या इच्छेनुसार श्रीसंत गोदडनाथांच्या सांगण्यावरुन पंधरवड्याची, दशमीची वारी  सुरू केली. दरम्यान, त्यांनी कोळे येथून पायदिंडी सोहळा सुरू केला. तेव्हा एक बैलगाडी व 10 ते 15 वारकरी असे त्याचे स्वरूप होते. वयाच्या 100 व्या वर्षांपर्यंत पायी व नंतर पाच वर्षे घोड्यावरून आणि दोन वर्षे डोलीतून त्यांनी वारी केली व वयाच्या 107 व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले. आज घाडगेनाथांच्या पालखीत 300 च्यावर महिला,350वर तरुण आणि दोन हजारांवर अन्य भक्‍त- भाविक असा 2500 पेक्षा जास्त भक्‍तांचा सहभाग असतो. 

दिंडीचा शिंगणवाडी, कराड, करवडी, बोंबाळेवाडी, मांझोळी, पळसगांव, कुकुडवाड, म्हसवड, सूळेवाडी, तांदुलवाडी, वाखरी, पंढरपूर असे मुक्काम असतात. परतीच्या प्रवासात भाळवणी, फळवणी, हिंगणी आदी ठिकाणी मुक्‍काम असतो.