Mon, Jul 22, 2019 00:47होमपेज › Satara › रेठर्‍यातील ऐतिहासिक विहीर चारशे वर्षानंतरही मजबूत

रेठर्‍यातील ऐतिहासिक विहीर चारशे वर्षानंतरही मजबूत

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:43AMरेठरे बुद्रूक : दिलीप धर्मे 

रेठर्‍यात सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधलेली ऐतिहासिक विहिरीचा ठेवा, आजही पहावयास मिळत आहे. 1914 साली दुष्काळाने लोकांना जगणे अवघड केले होते. जमिनीमध्ये पाणी असले, तरी त्याचा उपयोग करता येत नव्हता. आतासारखे बोअरवेल, हातपंप, मोटर किंवा पाईप लाईनची कोणतीही साधनसामुग्री नसल्याने लोकांना विहिरीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र असे असले तरी ज्या मोजक्या विहिरीत पाणी होते, त्यात रेठर्‍यातील या ऐतिहासिक विहिरीचा समावेश आहे. 

आज मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांबरोबर पाणी  अत्यावश्यक बाब म्हणून गरजेचे झाले आहे. किंबहुना इतर गरजांना विलंब लागला तरी चालेल पण पाणी नसेल तर जगणे असह्य बनते एवढे महत्व पाण्याचे आहे. पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता ही नित्याचीच आहे. बोअरवेल, हातपंप, ओढे, तळे, कॅनॉल तसेच नद्यांही ओस पडू लागतात. त्यावेळी शेवटची आशा म्हणून लोक विहिरीकडेच धाव घेतात. जनावरे, पशुपक्षी, शेती, प्राणी या सार्‍यांची तहान विहिर पूर्ण करत असते. याच बरोबर शेतीलाही पाणी असल्या शिवाय अन्नधान्य पिकत नाही, हेही तेवढेच खरे असून पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणेज पाणी याची प्रचिती आल्या शिवाय रहात नाही. 

कृष्णानदीच्या काठी बसलेल्या रेठर्‍यात बाळकृष्ण विश्‍वनाथ रेठरेकर यांच्या गावंदर भागातील शेतात आजही चारशे वर्षापुर्वीची विहीर इतिहासाची साक्षीदार ठरली आहे. ज्यावेळी 1914 साली देशात दुष्काळ पडला होता त्यावेळी रेठर्‍याची विहीर, कर्नाटक विजापूर येथील ताजबागडे तळे व रायगड येथील गंगासागर पाणी साठा येथेच पाणी होते. अशी अख्यायिका  असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजही या घटनेची नोंद इतिहास काळात असून जुन्या विटा व दगडाच्या साहाय्याने याचे बांधकाम करण्यात आले आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी हे उपयोगी पडत आहे. चारशे वर्षे झाली तरीही ही विहीर आजही मजबुत स्थितीत असल्याचे बाळकृष्ण रेठरेकर यांनी सांगितले.

Tags : satara, historic, Rithar,