Thu, Jun 27, 2019 14:03होमपेज › Satara › बोगस मतदार नोंदणीत पदाधिकार्‍यांचा हात

बोगस मतदार नोंदणीत पदाधिकार्‍यांचा हात

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:29PMपाटण : प्रतिनिधी  

मल्हारपेठ येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  पदाधिकार्‍यांनी संगनमताने बोगस मतदार नोंदणीचे काम करण्यात आले असून या नोंदी रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दादासो आनंदा पानस्कर यांनी राज्य निवडणूक आयोग व संबंधित अधिकार्‍यांना दिले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, मल्हारपेठ येथे 30 नोव्हेंबरपर्यंतच्या मतदार नोंदणी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी झाली आहे. या नोंदणीसाठी संबंधितांनी पुरावे म्हणून बोगस रेशनकार्ड, बोगस मतदान नोंदणी अधिकारी दाखले बनवून स्थानिक ग्रामपंचायत राहिवाशी दाखले मिळवले आहेत. सदरचा प्रकार बोगस आहे याची माहिती असतानाही अशी बोगस रेशनकार्ड साक्षांकित प्रतींवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  पदाधिकार्‍यांनी सत्यप्रती करून त्यावर स्वाक्षर्‍या केल्या व शिक्के मारले आहेत. त्यामुळे अशा पध्दतीने शासनाची फसवणूक करणार्‍या या रॅकेटची चौकशी करून ही बोगस मतदार नोंदणी रद्द करण्यात यावी. यामध्ये सहभागी रॅकेटवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याबाबतचे सर्व पुरावे माहिती अधिकारातून मिळवले असून ते पुराव्यानिशी दाखलही केले आहेत. 

याचबरोबर मल्हारपेठ येथे व्यवसाय व नोकरीनिमित्त आलेल्या बाहेरच्या लोकांची मतदारनोंदणी दहा वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, सध्या यापैकी दीडशेहून अधिक जण येथे रहात नाहीत. अशांची नावे स्थानिक मतदार यादीत असून ती रद्द करण्याची आमची मागणीही अद्याप रखडलेली असून ही नावेही यातून वगळण्यात यावीत अशी मागणीही या निवेदनात दादासो पानस्कर यांनी केली आहे.  निवेदनाच्या प्रती राज्य निवडणूक आयोग, आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना देण्यात आले आहेत.

कारवाईसाठी पाठपुरावा करणार - हर्षद कदम

मल्हारपेठ येथे झालेला बोगस मतदार नोंदणी बाबतीत आपणही चौकशीची मागणी केली आहे. वरिष्ठांच्या मार्फत ही चौकशी करून संबंधित बोगस नोंदी रद्द करून असे प्रकार करणार्‍या रॅकेट तथा विद्यमान पदाधिकार्‍यांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी मीही पाठपुरावा करणार असल्याची माहीती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांनी दिली.