Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Satara › दाभोलकरांप्रमाणे आमचाही नंबर लागू शकतो :  शेट्टी

दाभोलकरांप्रमाणे आमचाही नंबर लागू शकतो :  शेट्टी

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:36PMसातारा : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खुनी गेली 5 वर्षे सापडत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे. समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या दाभोलकरांचा जर नंबर लागू शकतो तर आमचाही का लागू शकत नाही? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, दहशतवादाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोपही खा. शेट्टी यांनी केला.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना खा. राजू शेट्टी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना इचलकरंजी, माढा, बुलढाणा, वर्धा अशा 6 जागांवर निवडणूक लढवणार आहे. देशात आणि राज्यात भाजपाविरोधी लाट निर्माण झाली असून विधानसभा, लोकसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्यासमोर विरोधक कोणीही असला तरी मी लोकसभा निवडणूक लढवणारच  आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याइतपत येथील कार्यकर्ते सक्षम नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार देण्याचा प्रश्‍नच येत नाही.

किसनवीर सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली असली तरी त्यांना स्थगिती देण्याचा अधिकार कुणी दिला? त्यातून राजकीय अर्थ निघू शकतो. या स्थगितीला भ्रष्टाचाराचाही वास येत असल्याचा आरोप त्यांनी केला. किसनवीरसह अन्य साखर कारखान्यांवरील कारवायांना दिलेली स्थगिती त्वरित न उठवल्यास सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील साखर कारखान्यांची आजपर्यंत 346 कोटी रुपयांची थकबाकी असून कोल्हापूर जिल्ह्यात 186 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आम्ही साखर आयुक्तांना वसुलीबाबत निवेदन दिले आहे. या वसुलीतून शेतकर्‍यांची देणी भागवावीत, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात 2012 पासूनच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील शेती करणारा प्रत्येक घटक त्यात मराठा असो, पाटीदार, जाट, गुर्जर या समाजांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात राजीनाम्याचे लोण पसरले आहे. मात्र, मला राजीनामा देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे आधीच माझी भूमिका मी स्पष्ट केली असल्याने मी राजीनामा देवू शकत नाही.

दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्यासंदर्भात त्यांना छेडले असता  खा. राजू शेट्टी म्हणाले, भारताचे संविधान जगातील सर्वश्रेष्ठ आहे. ज्या  लोकांनी हे संविधान जाळण्याचा प्रयत्न केला ते देशद्रोही असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सरकारविरोधात काही बोलले तर देशद्रोही ठरवले जाते. संविधान जाळणार्‍यांना देशद्रोही ठरवणार का? असा सवालही खा. शेट्टी यांनी केला. भारतीय संविधानात दहशतवादाला थारा नाही. सर्वधर्मसमभाव मांडणारे आपण आहोत. वेगवेगळ्या रंगाचा दहशतवाद करणार्‍यांचा मी निषेध करतो. घटनेवर प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतीयांनी याचा निषेध केला पाहिजे. यावेळी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.