Tue, Apr 23, 2019 18:06होमपेज › Satara › ग्रामस्थांची प्रशासनाला आर्त हाक : स्वातंत्र्यानंतरही परवड अद्याप सुरूच

सांडवलीत येवून चार दिवस राहता का?

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:00PMसातारा : प्रतिनिधी

सज्जनगडाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या सांडवलीसह इतर गावातील माय-बापड्यांना पावसाळा आला की धडकी भरते. डोळे मिटून पाऊस थांबण्याची वाट बघतात. पावसाची अतिवृष्टी झाली की, पांगारे, पळसावडे धरणाच्या सांडव्यावरून पाणी जाते अन् ही गावे संपर्कहीन होतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या गावांना सुविधा मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. ना रस्ता, ना वाट अशा परिस्थितीत येथील गावे बारा किलोमीटर पायपीट करत आजारी व्यक्तीला पाटकुळीवर रुग्णालयात पोहचवतात. खुर्चीवर बसून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करणार्‍या, बिकासकामांचा डांगोरा पिटणार्‍या अधिकार्‍यांनो चार महिने नव्हे तर फक्त चार दिवस येवून सांडवलीत राहता का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

सातारा तालुक्याच्या पश्‍चिमेकडील पांगारे, पळसावडे, सांडवली, केळवली यासह अन्य गावांची भौगोलिक परिस्थिती भयावह आहे. डोक्यावर कडा, डोंगर अन खड्ड्यात गाव, अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत असतात. सांडवलीची अवस्था तर विचित्रच. पांगारे धरणावरून पुढे आल्यावर मोठ मोठे ओढे-नाले आहेत. जमिनींना दरवर्षी पावसाळ्यात भेगा पडतात  आणि त्या एखाद्या दरीप्रमाणे वाढतात. या भागातील सांडवलीसह 7-8 गावांनी 21 व्या शतकातही अद्याप एसटीचे तोंड पाहिलेले नाही. दुधाची गाडी सकाळी जाते, ती सायंकाळी येते, ही वाहतूक उन्हाळ्याची. पावसाळ्यात सांडव्यावरून पाणी वाहू लागले की वाहतूक ठप्प. कोणी आजारी पडले तर त्याला डोलित किंवा पाटकुळीवर घ्यायचे अन 12 किलोमीटरची पायपीट करायची, हे ठरलेले गणित. पिण्याचे पाणी झर्‍याच्या पाईपलाईनने नेलेले. उन्हाळा वाढला, झरा आटला की पाणी बंदच. पाऊस जास्त पडला की गढुळाच पाणी. धड रस्ताही नाही. जेथे झालाय तेथे खड्डेच खड्डे. असे वाटते पुढच्यावर्षी गाडी गावात येईल पण वनविभागाची अडचण तर ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे साटेलोटे, यातच सारे बिघडतं. त्यामुळे रस्ता काही पूर्ण होत नाही. लाईटच्या डीपीचे बॉक्स उघडे आहेत. गावात दोन दोन महिने लाईट असून नसल्यासारखी अवस्था असल्याने वर्षानुवर्षे ही परवड सुरूच आहे. ती  थांबणार आहे की नाही हे देवालाच माहित, अशी भावना येथील गावकर्‍यांची झाली आहे. 

आजारी व्यक्ती दोन तास पाठीवर

सांडवलीपासून पांगारेपर्यंत चालत येण्यासाठी तब्बल दोन तास लागतात. आजारी व्यक्तीला पाठीवर घेऊन येथील गावकर्‍यांना रुग्णालयात न्यावे लागते. तब्बल दोन तास आजारी व्यक्तीला नेण्यासाठी लागत असल्याने अनेकांना पाठदुखीचे त्रासही सुरू झाले आहेत. माणुसकीच्या नात्यातून लोकं एकमेकांना सहकार्य करत आहेत. मात्र, या रस्ताचीही अवस्था बिकट असल्याने नागरिकांना एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु अशा हालअपेष्टा अजून किती दिवस सुरू राहणार, असाही प्रश्‍न आहे.

अचानक पूर आला तर...मग काय खर नाही...

सांडवलीवरून पांगारेकडे येताना दोन धरणाच्या सांडव्यावरून यावे लागते. यात दोन्ही बाजूंनी ओढे आहेत पावसाळ्यात या ओढ्याना पूर येत असतो. तर कधी पाणी कमी असल्याने ग्रामस्थ पाण्यातून वाट काढत पांगारेपर्यंत येतात. परंतु या ओढ्यातून जात असताना अचानक पूर आला तर या विचाराने गावकर्‍यांच्या मनात धडकी भरत आहे. वर्षानुवर्षे या भागातील लोक या समस्यांचा सामना करीत आहेत. तरीही प्रशासन गप्प का? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

पाटण तालुक्यात अशीच अवस्था

पाटण तालुक्यातील मालदेव, जगमीनची भांबे, चोरगेवाडी, ढेन, तळदेव, मायणी, चोरगेवाडी या गावाची अवस्थाही सांडवलीसारखीच आहे. या गावांना नागरी सुविधा काय असतात हे माहीतच नाही. कोणी कोयना प्रकल्प बाधित तर कोणी वनखात्याच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असल्याने आजही सुविधांपासून वंचित आहेत.