होमपेज › Satara › मागास वस्त्यांचे रूपडे पालटले 

मागास वस्त्यांचे रूपडे पालटले 

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 10:58PMकराड : अशोक मोहने 

वॉर्ड क्रमांक दहाचा विस्तार फारसा मोठा नाही. दत्त शिवम सोसायटी, जय मल्हार कॉलनी, बागल वस्ती आणि माळी वस्ती हा या वॉर्डातील प्रमुख भाग. बहुसंख्येने मागासवर्गीय कुटुंब या वॉर्डमध्ये आहेत. येथील अंतर्गत रस्ते, घरे, सार्वजनिक शौचालये पाहिल्यानंतर या वस्त्यांचे रूपडे पालटल्याचे समाधानकारक चित्र दिसून येते.  

जयमल्हार, बागल वस्तीमध्ये बहुसंख्येने मागासवर्गीय कुटुंब वास्तव्यास आहेत. मागास भाग असला तरी नागरी सुविधांची कोणतीच उणीव या भागात दिसून येत नाही. उलट या भागातील विकासकामांवर विशेष लक्ष मलकापूर नगरपंचायतीने दिल्याचे जाणवते. ज्या दुर्लक्षित भागात विकास कामांना प्राधान्य द्यायला हवे, त्या ठिकाणी कामे झाल्याने या भागाचा पूर्ण कायापालट झाला आहे. रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास, प्राधानमंत्री आवास आदी योजनांतर्गत तेथील मागास लोकांना घरकुलाचे लाभ देण्यात आले आहेत. जुनी व मोडकळीस आलेली घरे पाडून त्या ठिकाणी नवे घरे बांधून देण्यात आली आहेत. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, सार्वजनिक शौचालयांचे युनिट, परिसराची स्वच्छता, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सर्वच बाजूंनी या वॉर्डचा विकास झाल्याचे दिसून येत आहे.   

दत्त शिवम सोसायटीमधील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीचे वृक्षारोपन केले असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारीही घेतली आहे. पर्यावरणाला महत्व देणारे या वॉर्डातील सूज्ञ नागरिक आहेत. बंदिस्त नाल्याचे काम पूर्ण झाले आहे. या नाल्यांसाठी रस्त्यामध्ये खुदाई करण्यात आली होती. मात्र नाल्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत. शिवाय हे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्याचे कामही नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतले आहे. काही कॉलन्यांमधील रस्ते अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस सुरू झाल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. 

मलशुध्दीकरण केंद्र या वॉर्डमध्ये असल्याने त्या ठिकाणचे रस्ते चांगले झाले आहेत. मलकापूर शहराचे दूषित पाणी नदीत मिसळणार नाही, याची खबरदारी नगरपंचायतीने घेतली आहे. रिकाम्या व वर्षानुवर्षे पडून असणार्‍या  प्लॉटचा प्रश्‍न या वॉर्डमध्ये आहेच. नगरपंचायतीने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. 

असा आहे वॉर्ड क्रमांक दहा...

या वॉर्डमध्ये बागलवस्ती रस्ता क्रमांक 2 उत्तरेकडील भाग, राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसर, दत्त शिवम सोसायटी, जयमल्हार कॉलनी परिसर, माळी वस्ती, दांगट वस्ती या भागाचा समावेश होतो. या वॉर्डची लोकसंख्या 1691 इतकी असून हा वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. दोन्ही गटाकडून इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. 

वॉर्ड क्रमांक दहामधील इच्छुक उमेदवार...

प्रभाग क्रमांक 10 हा अनुसूचित जाती महिला जागेसाठी आरक्षित असल्याने या वॉर्डमध्ये ताकदीचा उमेदवार शोधण्याची मोहीम दोन्ही गटाकडून सुरू आहे. या दोन्ही गटाकडून तीन ते चार उमेदवारांची चाचपणी झाली आहे.  नारायण पेंटर यांच्या कुटुंबातील महिला, आबा सोळवंडे यांची पत्नी तसेच खिलारे कुटुंबातील महिलांची नावे चर्चेत आहेत.