Fri, Apr 26, 2019 09:50होमपेज › Satara › उघड्यावरील खाद्यपदार्थ जीवाला धोकादायक

उघड्यावरील खाद्यपदार्थ जीवाला धोकादायक

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 9:06PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरात खाद्यपदार्थांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी उघड्यावरील अन्नपदार्थावरच ग्राहकांच्या उड्या पडत असतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मात्र, याकडे  अन्‍न  आणि औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील अन्‍नपदार्थांचे असणारे गाडे याची तपासणी अन्‍न आणि औषध प्रशासनाकडून कधी होते? हा खरा संशोधनाचा विषय आहे.

सध्या पावसाळा सुरु असल्याने शहरात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्याने त्यात अजून भर पडत आहे. शहरातील विविध भागात गेल्या काही वर्षांपासून हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थांचे व्यवसाय वाढले आहेत. हॉटेल्स, वडापाव सेंटर, चिनी खाद्यपदार्थांचे गाडे यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, अनेक ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जातेे. हा एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे. असे असले तरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे  त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने विविध आजारांची लागण होते. काही वर्षापासून लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. शहरात कॉलेज रोड, राजवाडा चौपाटी, वाढे फाटा या ठिकाणी असणार्‍या चौकात  खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. विविध स्टॉलवर उघड्यावरच अन्नपदार्थ आहेत. खाद्यपदार्थांचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करताना काळजी घेेणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उघड्या अन्नपदार्थांवर माशा बसतात. हे पदार्थ खाल्ल्यावर पोटाचे विकार होण्याची भीती असते. त्याचबरोबर अनेक जण विविध रोगांना बळी पडत असतात. अशा उघड्यावरील खाण्यामुळे साथीच्या रोगांचा फैलाव होत असतो. याकडे अन्‍न व औषध प्रशासन लक्ष देते का? हा खरा प्रश्‍न आहे.

असे खाणे शक्यतो टाळा

शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्टॉल्सवर भजी, वडापाव, इडली, समोसा, कचोरी, गोबी मंचुरी, दहीवडा, उडीदवडा, फ्राईड राईस, नुडल्स आदी पदार्थ उघड्यावर ठेवलेले असतात. हे उघड्यावरील पदार्थ शक्यतो खाणे टाळा.