Sun, Feb 23, 2020 09:30होमपेज › Satara › शिवराज चौकातील उड्डाणपूल खचला

शिवराज चौकातील उड्डाणपूल खचला

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
कोडोली : वार्ताहर

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप चौकातील नव्याने उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाला बुधवारी सायंकाळी 7 वाजता भगदाड पडू लागल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यान महामार्गावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रस्त्याने ती वळवण्यात आली. दरम्यान, अवघ्या अडीच महिन्यांतच उड्डाण पुलाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाल्याने संताप व्यक्‍त होत आहे.

शिवराज पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपूल दिवाळी दिवशीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे अडीच महिन्यांतच या उड्डाण पुलाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होणारी घटना बुधवारी घडली. सायंकाळी 7 च्या दरम्यान संभाजीनगरमधील रियाज मोमीन हे भुयारी मार्गातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर उड्डाण पुलाचे सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडले. या घटनेने ते भयभीत झाले.

त्यांच्यासह नागरिकांनी उड्डाणपुलाच्या दिशेने नजर टाकली असता पुलाला भगदाड पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यादरम्यान नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रकारानंतर भुयारी मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक नागरिकांनी बंद केली. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलिसांशी संपर्क साधला. रात्री 8 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी एस. के. सिंग व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलावर व भुयारी मार्गावरील वाहतूक बंद केली. महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर शिवराज चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौका दरम्यान सर्व्हिस रस्त्याने वाहतूक सुरू करण्यात आली. 

खिंडवाडी उड्डाण पुलाबाबतही भीती

शिवराज पेट्रोल पंप उड्डाण पुलाचा भराव खचू लागल्याने रिलायन्सच्या निकृष्ट कामाचा आणखी एक नमुना पुन्हा समोर आला आहे. यापूर्वीही सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील अजंठा चौकातील पुलाला भगदाड पडले होते. त्यानंतर पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. अशीच परिस्थिती खिंडवाडी येथील उड्डाण पुलाचेही काम असेच झाल्याने या ठिकाणी भगदाड पडण्याची भीती व्यक्‍त होत आहे.