Sun, Aug 18, 2019 21:31होमपेज › Satara › ‘ती’ गावे वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

‘ती’ गावे वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 9:54PMपाटण : प्रतिनिधी

कोयना अभयारण्यातील 14 गावे वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रश्‍न निकाली निघेल, असा विश्‍वास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पाटणकर यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेतली असून या भेटीत याबाबत सकारात्मक आश्‍वासन देण्यात आले आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी नुकतीच पाटण तालुक्यातील विविध प्रश्‍न, मागण्या या संदर्भात प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत गृह, जलसंपदा, पर्यटन, नगरविकास, क्रिडा, वन व वन्यजीव विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांपासून कोयना विभागातील पर्यटन, रोजगार निर्मिती, बोटिंग बंद आहे. यासह येथील महत्वपूर्ण शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली. यामुळे कोयना विभागाला बकाल रूप आले. याच पार्श्‍वभूमीवर प्रवीणसिंह परदेशी यांचेकडे ही बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये कोयना धरणाची सुरक्षितता अबाधित ठेवत येथे बोटिंग लवकरच चालू करण्यात येणार आहे. यात पर्यटकांसाठी आकर्षण व स्थानिकांच्या रोजगारासाठी बोटींग, वॉटर स्पोटर्स, कायाकिंग, रिव्हर राफ्टींग आदी व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात यावेत. कोयना अभयारण्यातील चौदा गावे वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ पाण्याखाली गेलेल्या जमिनी त्यांचे सर्व्हे नंबर तपासून नकाशे पहाणे व अंतिम अधिसूचना जारी करणे एवढेच काम बाकी आहे. तेही लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. वन्य प्राण्यांचा होणारा त्रास मानवी व पाळीव प्राणी यांच्यावरील हल्ले व शेतीचे नुकसान याबाबत अवश्यक त्या ज्यादा उपाययोजना व जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

जिल्ह्याचा व बफर झोनचा विकास आराखडा दोन वर्षांपूर्वी निश्‍चित झाला आहे. याचा फायदाही सर्वसामान्य जनतेलाच होणार आहे. याशिवाय आणखी काही समस्या, विविध प्रश्‍न, मागण्या याबाबत शासन संवेदनशील आहे. या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळेच याबाबतही लवकरच अंमलबजावणी होईल, असा विश्‍वास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच शासनस्तरावर सर्वसामान्यांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही विक्रमसिंह पाटणकर यांनी यावेळी दिली आहे.

Tags : Satara, final, phase, process,  excluding, villages