Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Satara › एक जूनपासून शेतकरी निघाला संपावर

एक जूनपासून शेतकरी निघाला संपावर

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 10:56PMकराड : प्रतिनिधी

एक ते दहा जून दरम्यान देशभरातील शेतकरी संपावर जात असून शहरांचा दूध व भाजीपाला पूर्ण रोखला जाणार असल्याची माहिती ‘किसान क्रांती’च्या राज्य समन्वयक अ‍ॅड. कमलताई सावंत यांनी गुरूवारी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी ‘किसान क्रांती’चे धर्मराज जगदाळे, दत्ता  शेडगे, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, युवा आघाडी अध्यक्ष विश्‍वास जाधव यांची उपस्थिती होती. 

अ‍ॅड. सावंत म्हणाल्या, राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने 1 ते 10 जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संप  पुकारण्यात आला आहे. या संपात 23 राज्यांतील 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रात कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किसान क्रांती’ व ‘भूमाता संघटना’ नेतृत्व करत आहेत.  आज शेतकर्‍याला कोणी वाली राहिलेला नाही. 

शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. भाजप सरकारने उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. उलट शेतमालाचे भाव अधिकच गडगडले. दोन रूपये किलोने टोमॅटो विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. अन्य फळभाज्यांचीही हीच अवस्था झाली. सहकारी साखर कारखानदारीही शेतकर्‍यांना लूटत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. 

संपकाळात शेतकर्‍यांनी आपला शेतमाल शहरात न आणता गावातच शेतकर्‍यांना विकावा. दूधही शहरात पाठवू नये. भविष्यात शेतमालाला चांगले भाव हवे असतील व हमी भावाविषयी कायदा करायचा असेल तर शेतकर्‍यांनी या संपात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. वर्षानुवर्षे कवडीमोल भावाने शेतमाल विकण्यापेक्षा संप काळात सहभाग घेतल्यास सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडता येईल, असेही अ‍ॅड. सावंत यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात संप यशस्वी करून दाखवणार.. 

देशपातळीवरील शेतकरी संपाचे नियोजन राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय कोअर कमिटीत संदीप आबा गिड्डे - पाटील नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्रात किसान क्रांती, भूमाता, बळीराजा यासह विविध संघटना शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली.