Wed, Jul 24, 2019 08:20होमपेज › Satara › शहीद जवानाचे  कुटुंब प्रचंड तणावाखाली 

शहीद जवानाचे  कुटुंब प्रचंड तणावाखाली 

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:25PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

सीमारेषेवर दहशतवाद्यांशी लढताना 13 वर्षांपूर्वी शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयांवर कोळे (ता. कराड) येथे बेघर होण्याची वेळ आली आहे. शासनाच्या जागेत अतिक्रमण केल्याने त्वरित जागा रिकामी करावी, असा लेखी आदेश तहसीलदारांकडून शहिदाच्या वृद्ध माता-पित्यांना देण्यात आला आहे. मुळातच भूमिहीन असलेल्या या कुटुंबावर या आदेशामुळे अक्षरश: आभाळच कोसळले असून ते प्रचंड तणावाखाली आहेत.

कोळेतील जवान प्रकाश मुडगे  12 जून 2004 रोजी सीमारेषेवर दहशतवाद्यांशी लढत असताना राजौरी पूंछ सेक्टरमध्ये ते वयाच्या 22 व्या वर्षी शहीद झाले. शहीद प्रकाश मुडगे यांच्या कामगिरीमुळे जम्मू काश्मीर सरकारने त्यांना सेना मेडल जाहीर केले असून, वयोवृद्ध काशिनाथ मुडगे यांच्यासह त्यांच्या पत्नीचा दरवर्षी सन्मान केला जातो.

भूमिहीन असणारे शहीद जवान मुडगे यांचेे कुटुंब 1985 पासून कोळे गावात वास्तव्यास आहेत. त्यांचे निवासस्थान शासकीय जागेत आहे. त्यामुळे ही जागा रिकामी करावी, असा आदेश 2015 साली तहसीलदारांनी मुडगे कुटुंबीयांना बजावला होता. 2009  पासून या कुटुंबाने शासनाकडे सदर जागा कुटुंबीयांच्या नावावर करावी, असा पाठपुरावा केला आहे. शिवाय गेल्या 25 वर्षांपासून शासनाचे सर्व कर मुडगे कुटुंबिय भरत आहेत.

त्यामुळेच आता केव्हाही प्रशासनाकडून मुडगे यांच्या घरावर बुलडोझर फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रकाश मुडगे यांचे वृद्ध माता - पिता प्रचंड तणावाखाली असून शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे. आमच्या मुलाने देशासाठी दिलेले बलिदान लक्षात घेत आमचे राहते घर पाडू नये. आम्हाला बेघर करू नये, अशी विनंती काशिनाथ मुडगे यांनी केली आहे. 

बेळगाव 16 मराठा लाईट इन्फंट्रीच्या कमांडर यांनीही 31 जून  2017  रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून मुडगे कुटुंबाला न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे. मात्र गेल्या आठ वर्षांपासून या कुटुंबाच्या पाठपुराव्याला यश आलेले नाही. कराड कार्यालयातून सातारा  कार्यालय असा त्यांच्या फायलीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. प्रशासनाने या कुटुंबाला न्याय देऊन शहिद जवान प्रकाश मुडगे यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होता.