Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Satara › वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार

वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 8:23PMवाई : प्रतिनिधी

वाई तालुक्यात ऑलिंम्पिक दर्जाचे खेळाडू घडत असताना त्यांना सरावासाठी वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल नाही. भविष्यात वाई तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले.

वाई तालुका शिवछत्रपती क्रीडा संस्थेच्यावतीने आयोजित वाई तालुक्यातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, विजयसिंह नायकवडी, नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, संस्थेचे पदाधिकारी पै.विलास देशमुख, प्रा. समीर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मांढरदेवीसारख्या ग्रामीण भागातून कालिदास हिरवे, जनाबाई हिरवे या खेळाडूंनी अ‍ॅथलेटीक्समध्ये वाईचे नाव गाजवले. एकता शिर्के  हिने तर धनुर्विद्येसारख्या खेळात स्वतःकडे चांगले शिवधनुष्य नसताना प्राविण्य मिळवून शिवछत्रपती  क्रीडा पुरस्काराला गवसणी घातली. कबड्डीत स्नेहल साळुंखेने दैदिप्यमान  यश संपादन केले तर आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग खेळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सामर्थ्य डॉ. संजय मोरे यांनी सिद्ध केले. या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल हवे आहे, असेही आ. पाटील म्हणाले.

यावेळी शशिकांत पिसाळ, विजयसिंह नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले.  पसरणीची धनुर्विद्येत एकता शिर्के, कबड्डीमध्ये वरखडवाडीची स्नेहल साळुंखे, बॉडी बिल्डींगमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणारे संजय मोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा  आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. वाई तालुका शिवछत्रपती क्रीडा संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास वाई तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.