Sat, Jul 20, 2019 10:43होमपेज › Satara › पाटबंधारे अधिकार्‍यांना शेतकर्‍यांचा घेराव

पाटबंधारे अधिकार्‍यांना शेतकर्‍यांचा घेराव

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 10:48PMकराड : प्रतिनिधी

आरफळ डाव्या कालव्यावरील सुमारे दहा ते बारा गावातील शेकडो शेतकर्‍यांची तोडलेली वीज कनेक्शन जोडून शेतकर्‍यांना पाणी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मसूर (ता. कराड) येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास पोलिसांनी केलेल्या शिष्टाईनंतर रविवारी जिल्हाधिकार्‍यांसमवेत या विषयावर बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, प्रमोद जगदाळे, दादा यादव यांच्यासह अशोक पवार, सुरेश माने, हणमंत माने, सुभाष शिंदे, सतीश पवार, गणेश थोरात, धनंजय जाधव, गणेश पोळ यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी आरफळच्या डाव्या कालव्यावरील शेतकर्‍यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्याची मागणी करत मसूर येथे पाटबंधारे कार्यालयात अधिकार्‍यांना घेराव घातला. नलवडे यांनी शेतकर्‍यांची सद्यस्थिती अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देत वीज कनेक्शन नसल्याने शेतीला पाणी पाजता येत नसल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले. तसेच या प्रश्‍नी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

सातारा जिल्ह्यात बहुतांश धरणे असून त्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जमीन देत त्याग केला आहे. मात्र तरीही शेतकर्‍यांना पाणी मिळत नाही. सद्यस्थितीत कालव्यावरील शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यामुळेच मसूरसह वडोली, शहापूर, अंतवडी, रिसवड, वाघेरी, करवडी, राजमाची, वनवासमाची यासह परिसरातील अन्य गावातील शेकडो शेतकर्‍यांना मोठा फटका असला आहे. आरफळ डावा कालवा सल्लागार समितीचे पाटबंधारे मंत्रालयाच्या दालनात बैठक होऊन त्यात सातारा, सांगली जिल्ह्यासाठी पाण्याचे आवर्तन ठरविण्यात येते. गेल्यावर्षी 15 ऑक्टोबरला बैठक होऊन 26 एप्रिल रोजी कालव्यात पाणी सोडण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र असे असताना सांगली जिल्ह्यासाठीच पाणी सोडण्यात आले. सांगली जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यासाठी कोण दबाव टाकत आहे असा प्रश्‍न उपस्थित करत मागील वर्षी धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत. मात्र तरीही वेळेवर पाणी का दिले जात नाही असा प्रश्‍न उपस्थित करत कराड तालुक्यातील कालव्या लगतची पिके वाळली आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा देत येत्या एक ते दोन दिवसात सर्व कनेक्शन जोडावे अन्यथा आंदोलन करू असा सज्जड इशारा नलवडे यांनी अधिकार्‍यांना दिला आहे. 

कराड तालुक्यावरच अन्याय का?

सातारा जिल्ह्यातील कालव्यालगत असलेल्या शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडण्याची सूचना वीज वितरण कंपनीस करण्यात आली होती. मात्र असे असूनही सातारा, जावळी, कोरेगाव या तीन तालुक्यात कनेक्शन कट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. हे आमच्यासाठी आनंददायी आहे. मात्र त्याचवेळी केवळ कराड तालुक्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करत तालुक्यासह शेतकर्‍यांवर अन्याय का केला असा प्रश्‍न नलवडे यांनी उपस्थित केल्याने अधिकार्‍यांसह उपस्थित क्षणभर अवाक झाले होते. 

Tags : Satara, encroachment, farmers, irrigation, authorities