Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Satara › तिघांचे बळी, तरी अधिकारी नामानिराळे

तिघांचे बळी, तरी अधिकारी नामानिराळे

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 9:00PMकराड : अशोक मोहने 

वीज कंपनी अधिकार्‍यांच्या गलथान कारभाराचा नाहक त्रास  ग्राहकांना नेहमीच सहन करावा लागतो.  अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता ग्राहकांच्या जीवावर बेतत आहे. वडगाव हवेली (ता.कराड) येथे वेगवेगळ्या घटनांत तिघांना जीव गमवावा लागला. दैव बलवत्तर म्हणून एकास जीवदान मिळाले. ठेकेदार व अधिकार्‍यांची अभद्र युती याला जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी वडगाव हवेली येथील दिगंबर सुरेश जगताप (वय 26) याचा शॉक लागून मृत्यू झाला. तेथील मोझीम शिवारातील शेतात बोअर सुरू करण्यासाठी तो गेला होता. वीज नसल्याने तो ट्रान्स्फॉर्मकडे गेला. ट्रान्स्फॉर्म उघडा होता. फ्यूज बॉक्समध्ये काही फ्यूज तुटलेल्या होत्या तर काही ठिकाणी फ्यूजच नव्हत्या. हे तेथील नेहमीचेच चित्र. ट्रान्स्फॉर्मला कोणी वाली नसल्याने शेतकरी परस्पर फ्यूजच्या तारा बदलणे, तारा घालून वीज प्रवाह सुरू करणे अशी कामे करत होते. तरीही वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना फ्यूज बसवाव्या असे वाटले नाही किंवा फ्यूज बॉक्सला कुलूपही घातले गेले नाही.

फ्यूज बॉक्स धोकादायक स्थितीत ठेवून अधिकारी ग्राहकांच्या जीवाशी खेळत होते. वीज अधिकार्‍यांचा गलथान कारभार अखेर दिगंबरच्या जीवावर बेतला. वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी फ्यूजमध्ये तार बसवत असताना त्याचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाला. याला सर्वस्वी वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत. अनेक दिवसांपासून फ्यूज बॉक्स उघडा असताना तो बंद करावा अथवा तेथे फ्यूज बसवाव्यात याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हसरं खेळत कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले गेले. दिगंबरचे गतवर्षीच लग्‍न झाले होते. तो एकुलता एक होता. त्याच्या निधनाने घरच बसले. आज या घटनेला पंधरा दिवस होऊन गेले तरी वडगाव हवेलीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली नाही. एकमेकांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न अधिकारी वर्गाकडून सुरू आहेत. 

मागील वर्षी तेथीलच अक्षय मुळीक या शाळकरी मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. ताण देण्यासाठी वीज पोलला लावलेल्या तारेत अचानक वीज प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडली; पण हा वीज प्रवाह आला कसा याचे उत्तर मात्र वीज कंपनीच्या अधिकर्‍यांकडे नाही. शेतमजूर कांतीलाल मुळे यांचाही विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. असे वर्षभरात तिघांना जीव गमवावे लागले आहेत.  

दोन महिन्यापूर्वी कंत्राटी कामगार वडगाव येथे खांबावर चढला होता. अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने तो खाली फेकला गेला. तो सुदैवाने वाचला मात्र मनगटापर्यंत हात भाजला.  एवढ्या दुर्घटना घडूनही अधिकार्‍यांची झोप जात नसेल तर आणखी कितीजणांचा बळी घेणार आहात, असा संतप्त सवाल वीज ग्राहकांनी उपस्थित केला आहे. एवढे होऊनही वीज कंपनीच्या कोणत्याच अधिकार्‍यांवर कारवाई झालेली नाही हे विशेष. चौकशी सुरू आहे, अहवाल आलेला नाही एवढे गोलगोल उत्तर वरिष्ठ अधिकारी देत आहेत. दुर्लक्षित कारभार करणार्‍या अधिकार्‍यांना वरिष्ठ पाठीशी घालत असल्याचा आरोप होऊ लागल्याने हे प्रकरण अधिकच  चिघळले आहे.