Wed, May 27, 2020 08:49होमपेज › Satara › मार्केट यार्डातील ‘ई-लिलाव’ कागदावरच

मार्केट यार्डातील ‘ई-लिलाव’ कागदावरच

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:03PMसातारा: महेंद्र खंदारे

‘ई-नाम’ (राष्ट्रीय कृषी बाजार) हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शेतीमालास चांगला दर मिळावा व शेतकर्‍यांची आर्थिक उन्‍नती व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी शेतीमालाचे ऑनलाईन सौदे सुरू करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी राज्यातील 30 बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील लोणंद, फलटण व कराड कृषी उत्पन्‍न बाजार समितीचा ‘ई-नाम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, या तिन्ही बाजार समित्यांमध्ये ठराविक शेतमाल सोडल्यास ई लिलाव हा कागदावरच राहिल्याचे दिसून आले आहे. तर इतर 7 बाजार समित्यांमध्ये हा उपक्रमच सुरू झाला नसल्याने शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. 

केंद्र शासनाच्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ सौद्याच्या ठिकाणी हजर असलेल्या खरेदीदारास भाग घेता येत होता. नजीकच्या काळात ई-लिलावाची व्याप्‍ती वाढून संपूर्ण महाराष्ट्र व त्यानंतर देशातील खरेदीदार व्यापार्‍यांना ‘ई-लिलाव’मध्ये ऑनलाईन सहभाग घेता येणार आहे. त्यातून खरेदीदार व्यापार्‍यांमध्ये स्पर्धा होईल व शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. राज्यात पहिल्या दोन टप्प्यात 85 बाजार समित्यांचा समावेश ‘ई-नाम’ मध्ये झाला आहे. आणखी 145 बाजार समित्यांही ‘ई-नाम’ अंतर्गत जोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात 95 टक्के शेतीमालाचा ई-लिलाव कागदावरच राहिला आहे. 

केंद्र शासनाने जिल्ह्यातील फलटण, लोणंद आणि कराड बाजार समित्यांना ‘ई-नाम’मध्ये समाविष्ट केले आहे. ‘ई-नाम’ अंतर्गत तांत्रिक सज्जतेसाठी या बाजार समित्यांना लाखो रूपयांचे अनुदानही देण्यात आले आहे. या अनुदानातून ‘ई-लिलाव’ यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यामध्ये लोणंद बाजार समितीचा नावलौकीक आहे. दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे व्यवहार बाजार समिती आवारात होतात. ही बाजार समिती ‘ई-नाम’ मध्ये आल्यानंतर फक्‍त कांद्याचाच ई-लिलाव केला जात आहे. बाजार समितीमध्ये 50 टक्के मालाचाच ई-लिलाव होतो. तर कराड बाजार समितीमध्येही दैनंदिन येणारा भाजीपाला आणि गुळाचाच लिलाव केला जातो. याचप्रमाणे हायटेक असणार्‍या फलटण बाजार समितीत तूर, मुग, उडीद, खपली आणि तांदळाचा ई-लिलाव केला जात आहे. 

बाजार समितीत आवक होणार्‍या सर्वच शेतमालासाठी केंद्र व राज्य शासनाने ई लिलाव अनिवार्य केला आहे. मात्र, काही अडते, खरेदीदार, व्यापारी या घटकांपासून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याची तक्रार बाजारसमितीची आहे. हळद, गुळ, मिरची व अन्‍नधान्य आदी सर्वच शेतमालाचे ‘ई-लिलाव’ सुरू करण्याचे ‘पणन’चे आदेश आहेत. मात्र, या तिन्ही बाजार समित्यांमध्ये हळद, मिरची व अन्‍नधान्याच्या ‘ई-लिलाव’चा ‘श्रीगणेशा’ही झालेला नाही. हा उपक्रम सुरू होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटल्यांनतरही ई-नाम प्रायोगिक तत्वावरच चालवले जात आहे. या प्रक्रियेमध्ये तिन्ही बाजारसमित्यांमध्ये व्यापारी, शेतकरी, अडते, हमाल, मापारी यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. 

तर परवाने निलंबित करा :‘पणन’चा आदेश

‘ई-नाम’ (राष्ट्रीय कृषी बाजार) प्रकल्प अंमलबजावणीच्या अनुषंगाने नुकतेच महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाने कृषी उत्पन्‍न बाजार समित्यांची आढावा बैठक घेतली होती. ‘ई-लिलाव’मध्ये सहभागी न होणारे अडते, व्यापारी यांचे परवाने निलंबित करण्याचे स्पष्ट आदेश पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिले आहेत.

‘ई-लिलाव’, ‘ई-पेमेंट’मुळे पारदर्शकता

‘ई-लिलाव’ पध्दतीमध्ये संगणकीय प्रणालीचा वापर करून शेतमालाच्या आवकेची नोंद, वजन, लिलाव प्रक्रिया होणार आहे. शेतकरी व अन्य घटकांना द्यावयाच्या रकमेची बिले तयार करणे, शेतमालाची जावक नोंद करणे या सर्व बाबीबी समाविष्ट आहेत. ‘ई-लिलाव’ मुळे बाजार समित्यांच्या कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता येणार आहे. ‘ई-पेमेंट’द्वारे शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची सुविधा या प्रणालीत आहे.