Thu, Jun 20, 2019 21:11होमपेज › Satara › एसटीतच चालकाला आला हार्टअ‍ॅटॅक

एसटीतच चालकाला आला हार्टअ‍ॅटॅक

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:02PM

बुकमार्क करा
खंडाळा : वार्ताहर 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर स्वारगेट ते कोल्हापूर जाणार्‍या एसटी बसच्या चालकास चालू गाडीत हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील ताबा सुटला. ही बाब एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने ताबडतोब गाडीचे ब्रेक दाबून गाडी थांबवली. प्रवाशाच्या समयसुचकतेमुळे 40 प्रवाशांचे प्राण वाचून मोठी दुर्घटना टळली. 

याबाबत माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावरून निघालेली कोल्हापूर आगाराची बस (क्र. एमएच 14 बीटी 4785) ही खंडाळा तालुक्यातील केसुर्डी फाट्याचा उड्डाणपूल ओलांडून पारगाव गावच्या हद्दीत 12  वाजण्याच्या सुमारास आली. त्यावेळी चालक भारत तुळशीदास होवाळ (रा. हातकणंगले) यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांचा एसटीवरील ताबा सुटला.  बस दोन्ही रस्त्याच्यामध्ये असणार्‍या दुभाजकावर, पुन्हा रस्त्यावर अशी दोन तीनवेळा करत गॅसच्या टँकरला घासत गेली.

त्याचवेळी चालकाशेजारी बोनेटवर बसलेल्या रमेश वाळके या प्रवाशाच्या ही गोष्ट लक्षात आली. वाळके यांनी ताबडतोब चालकाच्या खुर्चीकडे झेप घेत गाडीचा ब्रेक दाबला. यावेळी गाडी दुभाजकावर चढून पुन्हा रस्त्यावर उतरली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलिस स्टेशनचे सपोनि युवराज हांडे पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचले.

रुग्णवाहिकेची सोय करून चालक व जखमींना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून चालकास उपचारासाठी पाठवण्यात आले. एका प्रवाशाच्या चाणाक्षपणामुळे गाडीतील किरकोळ जखमी दोन प्रवासी वगळता अन्यजण सुखरुप राहिले. या अपघातात विलास सूर्यवंशी (वय 78) व मालू वाळके  (वय 46) हे दोघे किरकोळ जखमी झाले.