Tue, Mar 19, 2019 20:38होमपेज › Satara › ‘कोयने’चे दरवाजे साडेतीन फुटांवरच

‘कोयने’चे दरवाजे साडेतीन फुटांवरच

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 21 2018 1:33AMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पावसामुळे धरणात येणार्‍या पावसाच्या पाण्याचे प्रमाण कायम राहिल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे दुसर्‍या दिवशीही साडेतीन फुटांवरच स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात सद्यःस्थितीत 83.13 टीएमसी पाणीसाठा असून मंगळवार, 17 जुलैपासून धरणातून कोयना नदीत पाणी सोडले जात आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असणार्‍या कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या सर्वच ठिकाणी सध्या पावसाचा जोर ओसरला आहे.

सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 27 हजार 759 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर दुसरीकडे, धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेतीन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात 15 हजार 886 क्युसेक पाणी सोडले जात होते. तर पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक असे एकूण 17 हजार 986 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण घटले तरच धरणातून सोडले जाणारे पाणी थांबवणे अथवा कमी करण्याचा विचार सिंचन विभागाकडून केला जाणार आहे.  दरम्यान, धरणात सद्यःस्थितीत उपयुक्‍त पाणीसाठा 78.13 टीएमसी इतका आहे.