होमपेज › Satara › डॉल्बी वाजणारच : उदयनराजे

डॉल्बी वाजणारच : उदयनराजे

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 11 2018 8:47AM



सातारा : प्रतिनिधी

‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा. ही धमकी नाही समज आहे, असेही त्यांनी खडसावून सांगितले. 

गुरूवार तालीम मंडळाच्या गणेश मुर्ती मिरवणुकीत ‘मै हू डॉन’ हे गाणे डॉल्बीवर लावण्यात आले होते. त्यावेळी नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवत एकच बोलतो डॉल्बी वाजणारच असे खा. उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले. ते पुढे म्हणाले, दहीहंडी नुकतीच झाली आहे, नौंटकी करणार्‍यांनी नाचता येत नसताना नाचण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीला बघु काय हाय, काय नाय, कसं होत नाय, डॉल्बी तर वाजणारच. कोण बी येतंय,  फॉरेनची पाटलीण ठरवतंय, तुमच्या आमच्या सारखी  आवली लोकं? असे म्हणत स्वत:ची कॉलर उडवली. 

वाचा : डॉल्बी नाही म्हणजे नाहीच : नांगरे-पाटील

गणपतीत डॉल्बी वाजली तर गणेशभक्तांनाच  त्रास  होतोय. मग इतरांना त्रास होण्याचं कारण काय? झाला तर सहन करायचा? कारणे द्यायची नाहीत. एवढंच वाटतंय तर जुन्या बिल्डींगा पाडा, डागडूजी करा, नाही तर गप्प बसून गणेशभक्तांचा एक दिवसाचा हट्ट पूर्ण करा. डॉल्बी तर वाजणारच ही धमकी नाही तर समज देतोय. कोणत्या कोर्टात जायचे तर जावा काही फरक पडत नाही, असे सांगत शोले चित्रपटातील  डायलॉग मारत ‘जब तक है जान, तब तक मै नाचुंगी’ याप्रमाणे ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात प्रशासनाला चपराक दिली. यावेळी  ‘एक नेता एक आवाज, उदयनमहाराज, उदयनमहाराज’ अशा घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून गेला होता.