Sun, May 26, 2019 08:39होमपेज › Satara › सातारा : कन्या शाळेत अवतरली फुलपाखरांची दुनिया video

सातारा : कन्या शाळेत अवतरली फुलपाखरांची दुनिया video

Published On: Aug 17 2018 4:32PM | Last Updated: Aug 17 2018 4:32PMसातारा : प्रतिनिधी

फुलपाखरू म्हटलं की, अगदी थोरामोठ्यापासून लहान मुलापर्यंत आपलंसं करून टाकणारा सजीव, जैवविविधतेतील या महत्वाच्या घटकाविषयी, त्यांच्या सौंदर्याबद्दल सगळ्यांना आकर्षण असते. मग कुणी त्याला  कॅमेर्‍यात किंवा मोबाइलमध्ये टिपण्यासाठी  किंवा  कुणी त्यांना पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावताना दिसतात. याच फुलपाखरांची सर्वाना माहिती व्हावी यासाठी सातार्‍यातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. श्रीराम भाकरे यांनी फुलपाखरांच्या प्रदर्शनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

फुलपाखरांचे जीवनचक्र  या विषयावरील आकर्षक छायाचित्रांचे प्रदर्शन आज, शुक्रवारपासून कन्याशाळेत सुरू झाले आहे. भारतात आढळणार्‍या  विविध आकार व रंगांची अनेक फुलपाखरांची छायाचित्रे डॉ. भाकरे यांनी काढली आहेत. ती या प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत. फुलपाखरांच्या जीवनातील अंडी, अळी, कोष, या जन्मावस्थांचे शास्त्रीय विवेचन व प्रत्येक अवस्थेची अनेक छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.

प्रदर्शनात सुमारे 125 प्रजातीच्या फुलपाखरांची माहिती छायाचित्रातून देण्यात आली आहे.पश्चिम घाटात व सर्व भारतात आढळणारी ही दुर्मिळ फुलपाखरांची छायाचित्रे काढण्यात आली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे प्रसिध्द नेत्रतज्ञ व निसर्ग व पर्यावरणप्रेमी डॉ. श्रीराम भाकरे यांनी यावेळी सांगितले. शुक्रवारी सकाळपासून सातारा शहर व परिसरातील निसर्ग व पर्यावरणप्रेमीसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. हे प्रदर्शन पहाताना अनेकांना या फुलपाखरांचे फोटो टिपण्याचा मोह आवरता आला नाही त्यामुळे अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये फुलपाखरांच्या रंगछटा टिपताना दिसत होते. फुलपाखरांच्या या अनोख्या प्रदर्शनातून विविध प्रजातींची जनजागृती झाली. प्रदर्शनाच्या निमित्ताने फुलपाखरांच्या विविध प्रजातींची माहिती मिळण्यास मदत झाली. फुलपाखरू प्रदर्शन रविवारपर्यंत सकाळी  10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असल्याचे ड्रोन्गो पर्यावरण संस्था, रानवाटा व रोटरी क्लब ऑफ साताराच्यावतीने सांगण्यात आले.

डॉ. श्रीराम भाकरे व अंबोलीचे हेमंत ओगले यांनी पश्चिम घाटातील फुलपाखरांच्या प्रजातीचा अभ्यास करून माहितीपूर्ण  असे अ गाईड टू द  बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट हे पुस्तक लिहीले असून या पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्र  राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष प्रसिध्द निसर्गतज्ञ विलास बर्डेकर यांच्या हस्ते झाले.आपल्या भागात आढळणार्‍या सर्व फुलपाखरांच्या  प्रजातीची सुंदर माहिती या पुस्तकात असून वेगवेगळ्या प्रजाती ओळखण्यासाठी मार्गदर्शनही त्यामध्ये करण्यात आल्याचे डॉ.भाकरे यांनी सांगितले.