होमपेज › Satara › ग्रामीण रुग्णालयास येणार ‘अच्छे दिन’

ग्रामीण रुग्णालयास येणार ‘अच्छे दिन’

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:39PMमहाबळेश्‍वर : प्र्रेषित गांधी

पाचगणी येथील प्रसिद्ध बेल एअर हॉस्पिटल ला महाराष्ट्र शासनाने महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालय एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाने ग्रामीण रूग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली आहे. अनेक वर्षांपासून सुल असलेला वैद्यकीय सेवेचा बट्ट्याबोळ आता थांबला आहे. यामुळे स्थानिक व पर्यटकांना सक्षम वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणार्‍या महाबळेश्‍वरमध्ये फक्‍त एकच ग्रामीण रूग्णालयत असल्याने स्थानिक व पर्यटकांना फार अडचणी निर्माण होत होत्या. या रूग्णालयामध्येही पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. ही अवस्था बदलण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने पाचगणी येथील बेल एअर  हॉस्पिटलला प्रायोगिक तत्वावर हस्तांतरीत केले.

काही वर्षांमध्ये या रुग्णालयाची अवस्था ”न घर का न घाट का” अशीच काहीशी झाली होती.शासनाचे सततचे दुर्लक्ष वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे, मोडकळीस आलेली इमारत या अन अश्या अनेक समस्यांची जंत्रीच या ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत पाहावयास मिळत होती. आपत्ती निवारणासाठी सक्षम वैद्यकीय यंत्रणा, सुविधा या ठिकाणी नसल्याने पर्यटकांना प्राणास मुकावे लागत होते. महाबळेश्‍वरची लोकसंख्या न हंगामी अवाक लक्षात घेता वैद्यकीय मदत महत्वाची आहे याबाबत स्थानिक प्रशासन जिल्हा व राज्य शासन पूर्णपणे उदासीन होते. अपघात आजारांवर तातडीचे उपाय न होता वाई, सातारा येथे रुग्णांना पाठवण्याची पद्धत  गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली होती. 

केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार स्थानिक प्रशासनाकडून सुरु होते एखादा गंभीर प्रकार घडल्यानंतर तेवढ्यापुरता आवाज उठवला जात होता. मात्र, रुग्णालयासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे केवेळ वेळ आल्यानंतरच लक्ष दिले गेले.  या रूग्णालयास डझनभर मंत्र्यांनी भेटे दिल्या. निधीही मंजूर केला. मात्र, सोयी सुविधांच्या नावाने बोंबच होती. या विरोधात दै.‘पुढारी’ ने वारंवार आवाज उठवला होता. काही महिन्यांपूर्वी आ. मकरंद पाटील यांनी ना. दीपक केसरकर यांच्याशी या रूग्णालयासंदर्भात चर्चा केली होती.  

त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयास खासगी तत्वावर वैद्यकीय सेवा संस्थेला देण्यात यावी.तालुक्यातील इंडियन रेड क्रॉसचे बेल एअर या वैद्यकीय संस्थेला वैद्यकीय व्यवस्थेशी हस्तांतराबाबत चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या रूग्णालयाची पाहणी केली असून शासन याबाबत गंभीर असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही ना. केसरकर यांनी दिली होती.  बेल एअर हॉस्पिटलला शासनाने प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी चालवण्यास देण्याच्या निर्णयाने स्थानिकांनामध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामध्ये तालुक्यातील तळदेव व तापोळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

Tags : satara, satara news, Mahabaleshwar, rural hospital,  experimental basis,