होमपेज › Satara › घोड्याचे मसाज तेल पिल्याने चिमुरड्याचा मृत्यू

घोड्याचे मसाज तेल पिल्याने चिमुरड्याचा मृत्यू

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:32PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

महाबळेश्‍वर येथे 3 वर्षांच्या चिमुरड्याने बाटलीतील पाणी समजून घोड्याचे मसाज तेल पिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासिन रऊफ डांगे (वय 3) असे चिमुरड्याचे नाव आहे. 

स्कूल मोहल्ला या परिसरामध्ये डांगे कुटुंबीय राहत असून शहरापासून  एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या रांजणवाडी येथे डांगे यांच्या घरातील सदस्य बुधवारी नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्यासोबत लहानगा यासिन सुद्धा गेला होता. त्यावेळी घरात एका बाटलीमध्ये मसाज करायचे तेल ठेवले होते. खेळता खेळता पाणी आहे असे समजून लहानग्या यासिनने ते पिले.

बुधवारी रात्री उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालय महाबळेश्‍वर तद्नंतर त्याला वाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याने सातारा येथे हलवण्यात आले. मात्र, यासिनची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने त्याला पुणे येथील जहाँगीर रुग्णालयात नेले असता उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा यासिनचा मृतदेह घरी आणण्यात आला. त्यावेळी कुटुंंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.