Thu, May 23, 2019 14:50
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › तब्बल सव्वीस तासांनी अखेरचा मृतदेह अंबेनळी घाट दरीतून बाहेर

तब्बल सव्वीस तासांनी अखेरचा मृतदेह अंबेनळी घाट दरीतून बाहेर

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:41PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

पोलादपूर (अंबेनळी) घाटातील भीषण दुर्घटनेनंतर येथील वातावरण अद्यापही सुन्‍न आहे. तब्बल 26 तासांच्या अथक परिश्रमानंतर रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास एनडीआरएफचे जवान व विविध ट्रेकर्सनी अखेरचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. या अपघातात 30 जण ठार झाल्याचे निष्पन्‍न झालेे आहे. दरम्यान, मदत कार्य आता थांबवण्यात आले असून सर्व मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

पोलादपूर-महाबळेश्‍वर दरम्यानच्या अंबेनळी घाटातील दाभिळ टोक येथे शनिवारी सकाळी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात 33 जण ठार झाल्याचे शनिवारी समोर आले होते. या भीषण अपघातात कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधिक्षक प्रकाश सावंत-देसाई हे आश्‍चर्यकारक बचावले.

रविवारी एनडीआरएफचे जवान, सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्‍वर ट्रेकर्स,  यंग ब्लड अ‍ॅडव्हेंचर, कर्तव्य प्रतिष्ठान, महाड येथील सह्याद्री मित्र व कोकण कडा व गिर्यारोहक यांच्या टीमने मदत कार्याला पूर्णविराम दिला. अपघातातील अखेरचा 30 वा मृतदेह तब्बल 26 तासांच्या खडतर प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 30 असल्याचे स्पष्ट झाले. 

महाबळेश्‍वर येथील सह्याद्री व महाबळेश्‍वर ट्रेकर्स संघटनांचे सुमारे 40 जवान शनिवारी सर्व प्रथम अपघातस्थळी पोहचले होते. त्यांनी तातडीने बचाव कार्याला सुरूवात केली. या जवानांच्या मदतीला स्थानिक गावकरी पोलिस कर्मचारी,  महाबळेश्‍वर पालिकेचे कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था होत्या. बचावकार्य शनिवारी सकाळी 11 वाजता सुरु झाले. सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे जवान व संघटनांनी दिवसभर राबवलेल्या या कार्यात सायंकाळी 7 वाजेपर्यंत  14 मृतदेह 600 फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात आले होते. सायंकाळी 7 वा. पुणे येथून आलेले एनडीआरएफच्या जवांनाची एक तुकडी मदत कार्यात सहभागी झाली. त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत आणखी एक मृतदेह बाहेर काढला तर एनडीआरएफच्या माध्यमातून रात्रभर हे बचाव कार्य सुरू होते.

बसच्या टपाखाली काही मृतदेह अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बसचा टप गॅस कटरच्या मदतीने कापण्याचे काम रात्री पूर्ण करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी 6 वाजता पुन्हा खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एक - एक करत उरलेले 15 ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात यश आले. रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमाराला अखेरचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हेलावून टाकत होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धावून आलेले कोकणातील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र वायकर, आ. संजय कदम, आ. भरत गोगावले, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्व संघटना, ट्रेकर्स व एनडीआरएफच्या जवानांनी अखेरचा  मृतदेह बाहेर काढल्यानंतर सुस्कारा घेतला. 

बसच्या टपखाली 10 मृतदेह सापडले 

शनिवारी सायंकाळी 6.40 वाजता  एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर रात्रीच्या वेळी देखील मृतदेह काढण्याचे काम सुरु राहणार असल्याची माहिती दिली. मात्र  सायंकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत एकच मृतदेह काढण्यात त्यांना यश आले. अंधार व पाऊस असल्याने मदत कार्यात अनेक अडथळे येत होते. बसचा टप एका बाजूला तर उर्वरित सांगाडा दुसरीकडे पडला होता. टपखाली 10 मृतदेह असल्याने गॅस कटरच्या सहाय्याने या जवानांनी रात्रभर खडतर प्रयत्न करुन बसचा टप कापला.  रविवारी सकाळी बाकीचे मृतदेह काढण्यास सुरुवात झाली. एनडीआरएफची टीम व  महाबळेश्‍वर, सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी उर्वरित मृतदेह काढण्याची मोहीम सकाळी 11.30 वाजता संपवली.

क्रेन, लाईट, जनरेटरचा आधार... 

महाड येथील क्रेन व एमआयडीसीमधील जनरेटर्स, लाईट या साहाय्याने रात्रीच्यावेळी देखील मदत कार्य सुरुच होते. कोकणातील सर्वच विभागातील प्रशासन, यंत्रणा तसेच महाबळेश्‍वर नगरपालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार रमेश शेंडगे व कर्मचारी, अ‍ॅब्युलन्सचे अनंत वेलकर, वनविभागाचे अधिकारी या सर्वांनी या मदत कार्यात मोलाची भूमिका बजावली.