Wed, May 22, 2019 15:18होमपेज › Satara › वर्ल्ड हेरिटेज कासवर फुलांची पहाट

वर्ल्ड हेरिटेज कासवर फुलांची पहाट

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 11:12PMसातारा : प्रवीण शिंगटे

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती,
फुलराणी ही खेळत होती ।
बालकवींच्या ती फुलराणी कवितेतील या ओळींच्या अनुभूतीला कास पठारावर प्रारंभ झाला आहे. येथे एक दोन नव्हे, तर असंख्य रानफुलांच्या रंग सोहळ्यात कास पठार न्हाऊन निघायला सुरुवात झाली आहे. सध्या 35 ते 40 प्रजातींच्या रानफुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घातली आहे. फुलांच्या हंगामाची पहाट घेऊन कासची पूर्वा उजाडत आहे.
कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्‍चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. पश्‍चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचे नामांकन मिळाले आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार आता विविध रंगी रानफुलांनी बहरू लागले आहे. माळरानावर बहरलेले रानफुलांच्या ताटव्यांचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. त्यामुळे फुलांच्या बहराबरोबर पर्यटनाला बहर येणार असून, जिल्ह्यासह देश, विदेशातील पर्यटकांची पावले आता कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहेत.

सध्या कास पठारावर स्पंद तेरडा (जांभळा), चवर, डीपकांडी, टूथब्रश, आभाळी, निलिमा, अबोलिमा, नभाळी, पिवळी सोनकी, गुलाबी तेरडा, रानहळद पांढरी, पिवळी, लाल, तपकिरी, कापरू, सीतेची आसवं, गेंध (धनगर गवत) रानमोहरी, रानवागं, वाई तुरा, अशी 35 ते 40  प्रकारची फुले दिसू लागली आहेत. त्यामुळे पठारावर विविध फुलांच्या रंगीबेरंगी छटा पाहावयास मिळत आहेत. सध्या कास पठारावर जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या व पांढर्‍या रंगांची फुले पर्यटकांची आकर्षण ठरू लागली आहेत.

पावसाने जर उघडीप दिली, तर  कास पठार फुलांनी बहरण्यास आणखी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर पठारावर विविध प्रकारच्या रानफुलांच्या रंगछटा पाहावयास मिळणार आहेत. 

पर्यटकांसाठी घाटाई फाट्यावर पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली. तसेच कास पठारावर वाहनांसाठी नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.  वाहनतळावरून पर्यटकांना कास पठारावर नेण्यासाठी 6 खासगी 17 सिटच्या मिनी बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. या बसेससंदर्भात वन विभागाने करार केला आहे. वाहनतळ, कास पठारावरील टोल नाका व राजमार्ग येथे स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच पठारावर फुले पाहताना पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली, तर कास पठारावरील मुख्य प्रवेशद्वारासमोरील टोल नाक्यावर व राजमार्गावर निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे.    

पर्यंटकांना पिण्याच्या पाण्याची सोय राजमार्ग, वाहनतळा व टोलनाक्यावर केली आहे. याशिवाय कास पठारांवरील पर्यंटकांना फुलांची माहिती मिळावी यासाठी टोलनाक्यावर पुस्तक विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पठारावर कास कार्यकारी समिती, वनविभाग व सातारा व मेढा पोलिस दलांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पठारावरील फुलांची नासधुस पर्यटकांनी केल्यास पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत पर्यटकांना दंड होवू शकतो. तसेच पठारावर पर्यटकांसाठी विविध सूचना फलकही लावण्यात  आले आहेत.