Sat, Jan 19, 2019 19:57होमपेज › Satara › पाण्याच्या अतिरिक्‍त वापराने जमिनी धोक्यात

पाण्याच्या अतिरिक्‍त वापराने जमिनी धोक्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

अलिकडच्या काळातील  रासायनिक खतांच्या अति वापरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गोधनाबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पाणी व  रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीला अधोगतीकडे नेत असल्याचे जाणकार शेतकर्‍यांच्या लक्षात आले असून अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. 

पाश्‍चात्य संस्कृतीचे मोठे दुष्परिणाम शेतीमध्ये दिसू लागले आहेत. रासायनिक शेती, खतांच्या अतिरिक्‍त वापरामुळे अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यासाठी जागरूकपणे शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. गोधामासारखे प्रकल्प देशात जागोजागी व्हायला हवे आहेत. ज्यामध्ये गाई अथवा म्हैसीचे पालन करायला हवे. साधारणपणे गावागावातून असे प्रकल्प उभे राहिले तर याद्वारे गांडूळ खत निर्मिती, शेणखत निर्मिती, गोमूत्र निर्मिती होणार असून त्याद्वारे व्यापारी शेती करणेही शक्य होणार आहे. असे उपक्रम राबविले तर शेतीचीही भरभराट  व्हायला वेळ लागणार नाही.

आज बागायती क्षेत्रातील  बहुतांशी जमिनी क्षारपड होऊ लागल्या असून पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापराने त्यातून अन्नधान्याचे उत्पादन कमि प्रमाणात येऊ लागले आहे. अशा वेळी जमिनींचा पोत वाढण्यासाठी शेतकर्‍यांनी आतापासूनच पावले उचलायला हवीत. असे झाले तरच आपण भविष्यात येणारे संकट टाळू शकू. अन्यथा शेतकर्‍यांच्या भावी पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत.  

आजच्या या अतिफास्ट युगात फक्त पैसे कमवायच्या मागे शेतकरी लागला असून त्याचे शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ पाणी आणि खते वापरुन उत्पादन काढायचे एवढेच तंत्र त्याला महित आहे. अलिकडे काही प्रमाणात शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले असून भविष्यात ही संख्या वाढण्याची गरज आहे. 

रासायनिक खतांच्या भरमसाठ वापराने कंपन्यांची भरभराट होत असून शेणखतांचेही दर वाढत आहेत. यासाठी शेतकर्‍यांनी त्यांना शेती परवडण्यासाठी जनावरांचे पालन करायला हवे. ग्रामिण भागात जनावरे असली तरी त्यांची संख्या कमी होत आहे. ही संख्या वाढली तर शेतकर्‍यांना शेती परवडेल अशा स्वरुपात करणे सोपे जाईल. पण शेतकर्‍यांनी हे मात्र, लक्षात घ्यायला हवे आहे.