Sat, Apr 20, 2019 08:45होमपेज › Satara › महाबळेश्‍वर-पाचगणी पर्यटकांनी बहरले

महाबळेश्‍वर-पाचगणी पर्यटकांनी बहरले

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 9:00PMमहाबळेश्‍वर/पाचगणी : वार्ताहर

सलग चार दिवस शासकीय सुट्टया आल्याने महाबळेश्‍वर, पाचगणी ही जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली आहेत. अवघ्या महाराष्ट्रात तापमानाने चाळीशी पार केली असताना महाबळेश्‍वरमध्ये मात्र सकाळ संध्याकाळी थंडी, हळुवार वार्‍यांमुळे पर्यटक सुखावत आहेत. सायंकाळी नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत असून वेण्णालेकला  चौपाटीचे स्वरुप आले आहे तर थंड हवेचे डेस्टिनेशन म्हणून नावलौकीक असलेल्या पाचगणीत पर्यटकांची गर्दी वाढली असून विविध पॉईंट हाऊसफुल्ल झाले आहेत. 

सध्या उन्हाळी हंगाम सुरु होत असल्याने महाबळेश्‍वरला पर्यटकांची पावले वळत आहेत. महाबळेश्‍वरमधील सर्वात उंच असलेल्या   विल्सन पॉईंट येथे सुटणार्‍या थंडगार वार्‍याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले येथे वळताना दिसत आहेत. ऑर्थरसीट पॉईंटसह श्री क्षेत्र महाबळेश्‍वर, केट्स पॉईंट तसेच पश्‍चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉईंट येथे सुर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

वेण्णालेकला चौपाटीचे स्वरूप आले आहे. वेण्णालेकची पाणीपातळी घटली असली तरी नौकाविहाराचा आनंद पर्यटक लुटत आहेत. या सोबतच गरमागरम मका कणीस, पॅटिस, फ्रँकी, पावभाजी, पाणीपुरी, भेळ तर येथील चविष्ट स्ट्रॉबेरी विथ क्रीम, विविध रंगी आईस गोळा सारख्या थंड पदार्थांवर पर्यटक ताव मारताना पहावयास मिळत आहेत. हौशी पर्यटक  वेण्णालेकवर घोडे सवारीचा आनंद घेत आहेत. 
खरेदीसाठी येथील मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची  गर्दी होताना दिसत असून चणा, चिक्की, जॅम, फज सोबतच  प्रसिद्ध चप्पलची खरेदी करताना पर्यटक पहावयास मिळत आहेत. पोलीस प्रशासनाच्यावतीने वाहतुकी संदर्भात प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत असून वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे.

दरम्यान जगातील दोन नंबरचे पठार म्हणून ओळख असणार्‍या पाचगणीचे शैक्षणिक केंद्र म्हणूनही नाव आहे. शाळांनाही सुट्टी असल्याने सहकुटुंब, सहपरिवार पर्यटक पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत. पाचगणीच्या टेबल लँडवर  घोडेसवारी, गुफा या ठिकानी पर्यटकांनी आपली उपस्थिती दाखवत पर्यटनाचा आनंद लुटला. बाळगोपाळांनी स्ट्रॉबेरीची चव चाखत घोडेसवारीचा आनंद लुटला. 

पाचगणीत टेबल लँड पर्यटकांनी बहरले असताना सिडने पॉईंट, पारसी पॉईंट, राजपुरी केव्हज या पॉईंटकडेदेखील पर्यटकांची पावले वळली असून तेथील निसर्गाचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. 
महाबळेश्‍वरमध्ये ब्रिटिशकालीन  पोलो ग्राऊंडवर काही हौशी पर्यटक घोडेसवारी करताना दिसत आहेत तर येथील प्रसिद्ध गोल्फ ग्राऊंड पाहण्यासाठी पर्यटक कुतूहलाने जाताना पहावयास मिळत आहेत. ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.