Fri, Apr 26, 2019 20:19होमपेज › Satara › जगप्रसिद्ध पाचगणी पर्यटकांनी बहरली

जगप्रसिद्ध पाचगणी पर्यटकांनी बहरली

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 8:55PMभिलार / पाचगणी : वार्ताहर

तप्त वातावरणाने अंगाची लाही लाही करणारा कडक उन्हाळा, वातावरणातील बदल आणि मुलांच्या शाळा प्रवेशाची धांदल यामुळे पाचगणी हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. सर्वत्र वाढणार्‍या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेले पर्यटक थंड हवेच्या ठिकाणाकडे धाव घेत आहेत.

महाबळेश्‍वर-पाचगणी ही पर्यटनस्थळे बारमाही गर्दीने बहरलेली असतात. विशेषतः एप्रिल, मे व अर्धा जून महिना  शाळा, कॉलेजला सुट्टी असते. त्यामुळे  पर्यटक उन्हाळ्यात या दोन्ही हिल स्टेशनला पसंती देतात. सातार्‍यासह अनेक जिल्ह्यातील तापमानाने चाळीसी गाठली आहे. यापासून सुटका मिळण्यासाठी पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरे, गुजरात व परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात पाचगणीत दाखल होत आहेत. 

पर्यटकांची संख्या वाढल्याने दुचाकी, चारचाकी तसेच लक्झरी बस यांची रस्त्यावर गर्दी वाढली आहे. पाचगणी शहरातील  टेबल लॅण्ड, सिडने पॉईंट व पारसी पॉईंटवरून धोम जलाशयाचे विहंगम  दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पर्यटनाबरोबरच आईस्क्रीम, मक्याची भाजलेली कणसे, स्ट्रॉबेरी, करवंदे, जांभळे, विविध प्रकारची सरबते, जॅम खाण्याचा आनंदही पर्यटक घेत आहेत

टेबल लॅण्ड  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे  लहान मुलांना खेळण्याची साधने उपलब्ध आहेत. तेथे मुले मनसोक्तपणे आनंद घेत आहेत. उंट सवारी, घोडे सवारीचा आनंद ती घेत आहेत. घोडासवारीतून आनंद मिळवण्यासाठी बालगोपाळांची आई बाबांकडे मनधरणी झाल्यानंतर त्यांची परवानगी मिळाल्यानंतर ते घोडासवारीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. बाजारपेठेतूनही मोठ्या प्रमाणावर खरेदीतून उलाढाल होत असून विविध पाईंटवर पर्यटकांना निसर्गाचा आनंद मनसोक्त घेता यावा यासाठी पोलिसांकडून उपाययोजना सुरु आहेत.

पाचगणीत पोलिसांकडून वाहतुकीचे  उत्तम नियोजन केले गेले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक पोलिस या नव्याने स्थापन केलेल्या शाखेच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.