Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Satara › नव्या शैक्षणिक वर्षाची बाजारपेठेत चाहूल

नव्या शैक्षणिक वर्षाची बाजारपेठेत चाहूल

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 9:27PMसातारा : प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी उरला असला तरी आत्ताच नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे. सुट्टीच्या माहोलात मश्गूल असलेल्या बालचमुनांही शाळेचे वेध लागले आहेत. सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत शालेय साहित्यांची लगबग सुरू  झाली असून  बाजारपेठ शालेय वातावरणात न्हावून गेली आहे. 

परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. शाळेला सुट्टी असल्याने बच्चे कंपनीच्या मनावर टीव्हीवरील विविध मालिकामधील कार्टून्सच्या पात्रांनी  चांगलेच राज्य केले. आता लवकरच नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्यांचे आगमन झाले आहे. शाळा सुरू झाल्या की काही ठिकाणी आईबाबा घरातील टिव्हीचे केबल कनेक्शन काढतील.

त्यामुळे बच्चे कंपनीपासून  छोटा भीम, सर्वे सफर, मिक्की माऊस, अँग्री बर्डस, स्पायडर मॅन, बार्बी डॉल, मोटू पतलू, सुपरमॅन, बॅटमॅन, डॉक्टर झटका, चिंगम सर, जग्गू, राजू,  चुटकी, कालिया,  ढोलू बोलू, थॉमस, टॉम अ‍ॅन्ड जेरी, टॉम, जेम्स, ऑगी अ‍ॅन्ड द कॉक्रोच, हेन्‍री, रॉकी, पुसीकॅट, पॉवर रेन्जर्स, क्रिश थ्री, टारझन,माय टी राजू असे विविध प्रकारचे कार्टून्स दुरावणार आहेत. त्यामुळे कार्टूनशी विद्यार्थ्यांशी जवळीक कशी साधली जाईल, यासाठी  यावर्षीही शालेय वस्तूंचे उत्पादन करणार्‍या विविध कंपन्यांनी नवनवीन आकर्षक वस्तुंच्या निर्मितीवर कार्टूनचा प्रभाव पाडला आहे.

मुलांना आकर्षित करण्यासाठी बाजारात लहान मोठे टिफीन बॉक्ससह पिण्याच्या बॉटल नवीन डिझायन व आकर्षक रंगसंगतीत विक्रीसाठी आल्या आहेत. शालेय साहित्यावर कार्टून्सचा उपयोग करण्यात आला असल्याने शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढणार आहे.

आठवीची ठराविक पुस्तकेच बाजारात

शालेय साहित्यावर भुरळ पाडणारी कार्टून्स असल्याने त्यावर बच्चे कंपनींच्या उड्या नक्कीच पडणार आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी बाजारात शैक्षणिक साहित्याचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून दहावीची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत मात्र आठवीची ठराविक पुस्तकेच आली आहेत.

शालेय खरेदीसाठी आता गर्दी वाढणार...

नर्सरी बॅग, कॉलेज बॅग, टिफीन बॅग, वॉटर बॅग, वॉटर बॉटल, कंपास टिफीन यासह विविध शालेय साहित्यावर  मोटू पतलू, जग्गू, राजू, चुटकी, कालिया, ढोलू बोलू, क्रिस, हेन्‍री, रॉकी, पसी, टॉम, थॉमस, छोटाभीम, सर्वे सफर, मिक्की माऊस, अँग्री बर्डस, स्पायडर मॅन, बार्बी डॉल   बालगणेश, बाल हनुमान, बेन टेन  अशा प्रसिध्द कार्टून्स  चा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कार्टून्सवर बच्चे कंपनीच्या उड्या पडतील असा विश्‍वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. कॅल्क्यूलेटर, लाईटिंग व बटण दाबून उघडणारे कंपास बॉक्स, प्राण्यांचे आकार असलेले फॅन्सी पाऊच, रंगीबेरंगी आकर्षक खोडरबर, दर्जेदार नोटबूक  आदी शालेय साहित्य मुलांसाठी आकर्षण ठरले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास सुमारे 10 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत शालेय साहित्यांची लगबग सुरू  झाली आहे.  शालेय साहित्यांना 5 जूनच्या पुढे विद्यार्थी व पालकांमधून मागणी वाढेल असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.