Wed, Feb 20, 2019 10:37होमपेज › Satara › कॉलेज युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली

कॉलेज युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 9:58PMसातारा : मीना शिंदे 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये  होणारी वादावादी व त्यातून होणार्‍या हिंसक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवी पिढी दिशाहीन आणि आक्रमक तर होत चालली नाही ना,  असा सवाल कुसूर येथील युवकाच्या खुनाच्या घटनेमुळे निर्माण झाला असून पालकवर्गासह शिक्षकही या चिंतेने ग्रासले आहेत.

अलीकडील काळात शाळा महाविद्यालयांमध्ये हिंसा, बलात्कार, मारामारी अशा अनेक घटना घडत असून त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुले आक्रमक होत असल्याचे या घटनांतून निष्पन्न झाले आहे.  गुन्हेगारी प्रवृत्ती महाविद्यालयीन मुलांमध्ये वाढते आहे. मागील काही  महिन्यांमध्ये  महाविद्यालय परिसरातून बेपत्ता युवकाचा खून झाल्याची घटना  घडली होती. त्या घटनेनंतर कुसूर येथील महाविद्यालयीन युवकाचा पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन भोसकून केलेल्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यातील पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

चांगले शिक्षण मिळावे यासाठी जीवाचा आटापिटा करुन गरीबातले गरीब पालकही आपल्या मुलांना  मोठ्या महाविद्यालयांमध्ये पाठवतात. मात्र, ही मुले महाविद्यालय काळात शिक्षणाव्यतिरिक्त इतर उपद्व्याप करत असल्याने पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. भविष्यकाळातील दुभंगणारा समाज आपल्याला आजच दिसायला हवा. संस्कार, मूल्यशिक्षण याबरोबरच कायद्याचा वचक बसणे अत्यावश्यक आहे. असे घडले नाही, तर भविष्यकाळ तंत्रसमृद्ध असूनही सुखाचा ठरणार नाही, असे बोलले जात आहे.

Tags : Satara, crime, trend, among, college, youth, increased