Mon, May 27, 2019 09:23होमपेज › Satara › तलवारीने केक कापणार्‍या रेठरे येथील युवकावर गुन्हा

तलवारीने केक कापणार्‍या रेठरे येथील युवकावर गुन्हा

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:19PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

रस्त्यावर बॅनर लाऊन भर चौकात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करणार्‍यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बेकायदा धारदार शस्त्र बाळगून मोठ्या आवाजात स्पिकर लावल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अखिल अशोकराव मोहिते (रा. रेठरेबुद्रुक, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रेठरेबुद्रुक येथील अखिल अशोकराव मोहिते याचा मंगळवार दि. 26 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त परिसरात शुभेच्छा फलक लावले होते. मंगळवारी रात्री विकास सेवा सोसायटीच्या चौकात स्पिकर लावून वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी अखिल मोहिते याने आपल्या हातात 30 ते 35 इंच तलवार घेतली होती. दरम्यान, हा सर्व प्रकार पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना समजला.

त्यांनी त्वरित याची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना सांगून घटनेची खात्री करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार अशोक क्षीरसागर यांनी पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ रेठरेबुद्रुक येथे पाठवले. यावेळी झेंडा चौकात बॅनर लावलेले त्यांना दिसले. तसेच मोठ्या आवाजात स्पिकर लावून अखिल मोहिते हा हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी अखिल मोहिते याच्याविरोधात कारवाई करत बेकायदा शस्त्र बाळगणे, जोरजोरात स्पिकर लावणे, तसेच चौकात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचे फलक लावून चौकाचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विक्रम गेरसिंग वळवी यांनी फिर्याद दिली आहे.