Wed, Jul 17, 2019 18:08होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 10:46PMकराड : प्रतिनिधी 

पाटबंधारे व भूमिअभिलेख कार्यालयाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिल्यानंतर बुधवारी अखेर वाघेश्‍वरसह मसूर परिसरातील पाच गावच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू करण्यात आली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले असून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे सातबारा उतारे मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. वाघेश्‍वरसह परिसरातील पाच गावांमध्ये कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर 40 वर्षापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले होते.

मात्र त्यानंतर जमिनींची मोजणी न होणे, शेतीला रस्ता नसणे, शेतीला पाणी न मिळणे यासारख्या समस्यांनी प्रकल्पग्रस्त त्रस्त होते. याशिवाय साताबारा उतारे न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांसह संबंधितांच्या गावांना विकासकामांसाठी निधी मिळण्यातही अडसर निर्माण होत होता. या संपूर्ण समस्यांबाबत प्रकल्पग्रस्त वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. 

गेल्या महिन्यात 23 जानेवारीला बैठक घेत प्रांताधिकार्‍यांनी जमिनींची मोजणी करण्यासह न्याय देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतरही प्रांताधिकार्‍यांची ही विनंती धुडकावून लावत प्रजासत्ताकदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी प्रांत कार्यालयासमोर सामुहिक मुंडणही केले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी पाटबंधारे तसेच भूमिअभिलेख कार्यालयाचे काम बंद पाडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांसह सचिन नलवडे, अनिल घराळ यांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना दिले होते.भूमिअभिलेख कार्यालयाचे सर्व्हेअर दिलीप शेडगे, रविंद्र दोगाडे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता एस. के. गोरे, तलाठी एम. एम. कुलकर्णी, ग्रामसेवक सुभाष कुंंभार, सरपंच सुरेश कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.