Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Satara › बलशाली पिढी घडवण्याचे आव्हान

बलशाली पिढी घडवण्याचे आव्हान

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 8:51PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

आज समाजात घृणा, हिंसा, द्वेष. मत्सर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहावयास मिळते. त्यामुळेच समाजात वारंवार तेढ निर्माण होते. अशा वातावरणात मुलांना सकारात्मकरित्या घडवत बलशाली युवा पिढी घडवण्यचे आव्हान पालकांपुढे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले. 

घारेवाडी येथे झालेल्या बलशाली युवा हदय संमेलनाच्या समारोपप्रसंगी झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. प्रतिभा देशमुख, कर्‍हाडकर मठाचे मठाधिपती बाजीराव मामा कराडकर, समृध्दी जाधव, अविनाश सावजी, शिवमचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी, विश्‍वनाथ खोत, संभाजी देवकर, संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

इंद्रजित देशमुख म्हणाले, धाडस, धैर्य आणि पराक्रम या तिन्ही गोष्टीवर यश अवलंबून असते. तरुणांनो अपार कष्ट करुन, रात्रीचा दिवस करुन आपली स्वप्न वास्तवात उतरुन स्वतःची ओळख स्वतः तयार करा. शिवंममध्ये तयार झालेला तरुण हा बलशाली भारताचा एक घटक असावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही तीन दिवस हा ज्ञानयज्ञ दरवर्षी चालवतो. 

मित्र निवडताना गरुडासारखा आकाशात उंच भरारी घेणारा निवडा. आर्थिक सुबत्ता आल्याने अलिकडे भोग वाढला आहे. घरात आज गाडी, कारपेट, झुंबर या भोगवस्तू आल्या मात्र, समाधन हिरावले आहे. आभाळं फाटुन ज्यांचे आयुष्य अंधकारमय झाले आहे, त्यांच्या आयुष्यात प्रकाश दाखवण्याचा चांगुलपणा अंगीकारुन तरुणांनी वाटचाल करावी, असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले.

आज समाजात चांगुलपणा पेरण्यासाठी वेळ देणार्‍या माणसांची गरज आहे. तरुण पिढी बलशाली बनायची असेल तर निर्भय वातावरण निर्मीतीसाठी आत्तापासूनच समाजात चांगुलपणा पेरावा लागेल. शांती, उन्नतीची चळवळ सुरु करावी लागेल आणि त्या चळवळीची सुरूवात बलशाली युवा हदय संमेलनातून आजपासूनच करत आहोत. मागच्या चांगल्या आठवणी घेऊन पुढील वर्षी भेटू, असेही देशमुख यांनी सांगितले. 

कोणत्या वाटेला जायचे हे ठरवण्याची वेळ...

आयुष्यात कृतज्ञतेचे जीवनमुल्य मोठे आहे. जो दु:ख देतो, त्याला कोणी जवळ घेत नाही. जो गोड बोलतो, त्याच्या वाट्याला सुख येते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपण कोणत्या वाटेला जायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे, असेही इंद्रजित देशमुख यांनी स्पष्ट केले.