Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Satara › साहित्यामधून महानता शोधा : विश्‍वास पाटील 

साहित्यामधून महानता शोधा : विश्‍वास पाटील 

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:06PMकोरेगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्राची ही पवित्र भूमी ज्ञानेश्‍वरांची, तुकारामांची, साने गुरुजींची आहे. यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्र. के. अत्रे यांचे वाचन अफाट होते. त्यांची ग्रंथसंपदा विपुल होती. महान साहित्यिक संस्कृतीतून आपण महानता शोधली पाहिजे. ग्रंथ जगण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे ग्रंथासारखा तारक गुरु दुसरा कोणी नाही, असे प्रतिपादन ‘पानिपत’कार विश्‍वास पाटील यांनी केले. 
रहिमतपूर येथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, रहिमतपूर पालिका आणि विविध शिक्षण संस्थांच्यावतीने आयोजित रहिमतपूर ग्रंथमहोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब पाटील होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री फाळके, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ, उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा चंदुरे, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष शिवराज माने, नंदकुमार माने-पाटील, अरुण माने, प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, रुपेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विश्‍वास पाटील पुढे म्हणाले, रहिमतपूर नगरीला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक वसा व वारसा लाभला आहे. तो जपण्यासाठी सर्व शिक्षण संस्था एकत्र आल्या आहेत, हे कौतुकास्पद आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षा वैचारिक श्रीमंती महत्वाची असते. वाचनाने माणूस प्रगल्भ व समृद्ध होतो. छत्रपती शिवरायांचा इतिहास तरुण पिढीला कळावा, यासाठी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देवून आपला खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. 

आ. पाटील म्हणाले, टीव्हीमुळे वाचन संस्कृती कमी झाली आहे. वाचनाने माणुस सुसंस्कृत होतो. त्यामुळे युवकांनी वाचनाकडे वळले पाहिजे.

सुनील माने म्हणाले, या ग्रंथमहोत्सवाच्या निमित्ताने मोठी माणसं येथे आली. त्यातून रहिमतपूरकरांना साहित्यिक, सांस्कृतिक मेजवानी मिळाली आहे. यापुढेही असे वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र यायला हवे. कुलाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता भोसले, विश्‍वजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अच्युत माने यांनी आभार मानले.