Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Satara › कॉलेज परिसरातच रंगतायेत अश्‍लील थेरं

कॉलेज परिसरातच रंगतायेत अश्‍लील थेरं

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 8:56PMसातारा : प्रतिनिधी

एकीकडे देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील शिक्षणाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन शिक्षणविषयक कार्यक्रम राबवले जात असताना दुसरीकडे क्‍लास बुडवून कॉलेज परिसरातच असणार्‍या आडोशाच्या ठिकाणी नागरिकांदेखतच काही तरुण—तरुणी अश्‍लील थेरं करतानाचे धक्‍कादायक प्रकार घडत आहेत. या प्रकाराची पालकांबरोबर कॉलेज प्रशासनाने देखील गंभीर दखल घेण्याची मागणी सातारकरांतून होऊ लागली आहे. 

खरं तर कोणत्याही गोष्टीची सवय ही संगतीतूनच लागते. दहावीपर्यंत सोज्वळ असलेली मुलं—मुली कॉलेजला गेल्यावर मात्र वाईट संगतीला लागून बिघडतात. मग आपण जे करतोय, तेच योग्य! असं या मुलांना वाटतं. त्यामुळे हे तरुण स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतात. तसेच करिअरचंही वाटोळं करुन घेतात.

खरं तर कॉलेज भावविश्‍वाचा हळवा कप्पा अनेकांच्या मनावर जपलेला असतो. आतापर्यंत कॉलेज भावविश्‍वावर अनेकांनी सुंदर असा आपला प्रवास उलगडला आहे. मात्र सध्या मात्र कॉलेज विश्‍वात ज्या गोष्टी घडत आहेत, त्या खरोखरच धक्‍कादायक आहेत. शहरातील काही कॉलेज तर व्यसनांचे अड्डेच बनले आहेत. विशेष म्हणजे या व्यसनाच्या अड्ड्यात शाळकरी मुलांपासून कॉलेज तरुणांपर्यंत सर्वंजण व्यसनाच्या आहारी गेलेत.सध्या कॉलेजमधील कित्येक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या पुड्या आढळून येतात.

कॉलेजकुमारांनी तेथील भिंती व जमिनी लालभडक केल्या आहेत. ही मुले कॉलेजला न जात कॉलेज परिसरात टाईमपास फिरत असतात. कॉलेज प्रशासनाला या गोष्टी माहित असून त्याकडे ते दुर्लंक्ष करत आहेत.कॉलेजमध्ये जाऊन दोन—तीन लेक्‍चर करणे त्यानंतर मात्र मित्र—मैत्रिणींना चुकवून काही महाभाग सातार्‍यातील काही कॉलेज परिसरात क्‍लास धिंगाना करत असतात. दुपारच्या वेळी निमर्नुष्य असलेल्या बोळात किंवा आडोशाला हे खुलेआमपणे अश्‍लील चाळे करत असतात.

यावेळी परिसरातील नागरिकांनी हटकले तरी हे तरुण अगदी बिनधास्तपणे आपले कार्यक्रम सुरुच ठेवतात. त्यामुळे शरम सोडलेल्या या आजच्या तरुणाईच्या निर्लज्य प्रकारामुळे लहानांबरोबर थोरांदेखील माना खाली घालून जावे लागत आहे. या प्रकाराची कॉलेज प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्याची मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे.  
पालकांनो, आपल्या पाल्याला आवरा !

पैसा कमविण्याच्या नादात कुटुंबीय आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. मुलांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवून दिलं, पाहिजे तो क्‍लास लावून दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असा काही पालकांचा भ्रम असतो. पण खरंच आपला पाल्य कॉलेजला जातो का? पैसे भरुन लावलेल्या क्‍लासला वेळेवर जातो का? त्याची अटेडन्स किती असते, याची देखील माहिती पालकांना असली पाहिजे. पालकांच्या मुलांच्यावरील असलेल्या अति आत्मविश्‍वासामुळेच आजच्या तरुणाईला कशाचेच भय राहिले नाही.