सातारा : प्रतिनिधी
भीमा कोरेगाव येथील घडलेल्या घटनेमध्ये संभाजीराव भिडे गुरुजींचे नाहक नाव गोवले आहे. वास्तविक पाहता या प्रकरणामध्ये भिडे गुरूजींचा काहीच संबंध नाही. या प्रकरणाची खोलात जावून चौकशी करावी. या सर्वामागील सूत्रधारांचा छडा लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा कार्यवाहक सागर आमले म्हणाले, भिमा कोरेगाव येथील घटनेशी शिवप्रतिष्ठान व भिडे गुरूजींचा काहीही संबंध नाही. मुद्दामहून गुरूजींचे नाव गोवले आहे. घटनेवेळी भिडे गुरूजी आ. जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. मात्र, जाळपोळ व दगडफेक करताना भिडे गुरूजींना पाहिल्याचा फिर्यादीचा दावा खोटेपणा दाखवणाराच आहे. या घटनेची चौकशी करून खरी नावे जनतेसमोर यावीत. जिग्नेश मेवाणी हे पुण्यात येवून भडक भाषणे करतात त्यांचा बोलवता धनी कोण आहे? प्रकाश आंबेडकर यांना शिवप्रतिष्ठानचे नाव माहित नाही आणि त्यांच्याकडून गुरूजींवर आरोप होतात हे चुकीचे आहे. प्रकाश आंबेडकर यांचे मेहुणे तेलतुंबडे या कार्यक्रमांचे संयोजक होते. त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असून प्रकाश आंबडेकर व नक्षलवाद याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.
सतीश ओतारी म्हणाले, भिडे गुरुजी एका जातीसाठी लढत नाहीत. संपूर्ण धर्मासाठी लढत आहेत. जातपात, पंथ, राजकारण, अर्थकारण या पलीकडचे कार्य आहे. गुरूजींवर झालेले आरोप हे खोटे आहेत. कुणीतरी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेत महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काशिनाथ शेलार म्हणाले, बंदमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करण्यात यावी. याबाबत महाराष्ट्रात रान उठवणार असून शुक्रवारी जिल्हाधिकारी व तालुक्यातील प्रांत व तहसीलदारांना शिवप्रतिष्ठानच्यावतीने निवेदने देण्यात येणार आहेत. यावेळी संदीप जायगुडे, संतोष काळे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.