होमपेज › Satara › ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपण्याचे आव्हान

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपण्याचे आव्हान

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 10:22PM
सातारा : विशाल गुजर

जिल्हातील अनेक ऐतिहासिक, सार्वजनिक व शासकीय वास्तूंचे विद्रुपीकरण मोठ्याप्रमाणात होवू लागले आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ऐतिहासिक वास्तूवर अश्‍लिल लिखान करणार्‍यांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. त्यासाठी संबधित यंत्रणेपुढे ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 

जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या स्थळांना भेटी देण्यासाठी देशभरातील पर्यटक येत असतात. राज्यातील शाळा, कॉलेजातील विद्यार्थी सहलीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी भेट देतात. परंतु या ऐतिहासीक वास्तूचे विद्रुपीकरण या महाविद्यालयीन युवकांकडून होत आहे. ऐतिहासीक वास्तूवर अश्‍लिल लिखान करण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासीक वास्तूचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
अजिंक्यतारा किल्ल्याचे नावही या विकृत प्रवृतीच्या लोकांच्या तावडीतून सुटले नाही. ‘अजिंक्यतारा’ या नावावरच मित्र-मैत्रिण, युगलांची नावे, बदाम  काढून गिरवागिरवी करून वाट लावली आहे. या वास्तूंना विकृत स्वरुप आल्याचे पाहून पर्यटकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. 

सातार्‍यातील ऐतिहासिक वास्तू असणार्‍या चारभिंती, अजिंक्यतारा परिसराची दुरवस्था झाली असून मुख्य भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिला जात असल्याने इतिहासप्रेमींमध्ये संताप असून या ऐतिहासिक वास्तूचे चांगल्याप्रकारे जतन केले जावे. या वास्तूकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे या वास्तूचे सौंदर्य बिघडत आहे. तसेच या परिसरात मोठ्याप्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.  या वास्तूची जपणूक करण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

शूरांचा व क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातार्‍याची ओळख आहे.प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक वास्तू असून त्याची योग्य ती जपणूकसुध्दा करण्यात आली आहे. शहराच्या जवळच चारभिंती ही ऐतिहासिक वास्तू असून याठिकाणी असलेल्या शिलालेखात 1857 च्या लढ्यात सातारा तालुक्यातील शहीद झालेल्या क्रांतिकारकांची माहिती मिळते. सर्व माहिती ही शिलालेखात असल्याने ती शाबूत आहे. येथील निसर्ग व इतिहास याची सांगड घालून या वास्तू विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र, क्रांतिकारकांचा इतिहास असणार्‍या चारभिंतीला जणू काही ग्रहणच लागले आहे.

फक्‍त ऐतिहासिक वास्तूच नव्हे तर   दोन्ही बसस्थानक परिसरातही  अनेक प्रेमवीरांनी आपल्या प्रेमाचा इजहार अश्‍लिल शब्दात केला आहे. या मजकूरातून टिंगल टवाळी केल्याचेच दिसत आहे. संस्कृतीच्या जोरावरच सातार्‍याने देशभर डंका वाजवला आहे. परंतु, अशा ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण सुरू असल्याने संताप व्यक्‍त होत आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने विकृत प्रवृत्तींना बळ मिळत आहे. 

प्रेमीयुगुल अन् दारूच्या बाटल्या...

ऐतिहासिक वास्तू असलेल्या चारभिंती आणि अजिंक्यतारा परिसरातील सध्या प्रेमीयुगलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विद्यालय, महाविद्यालय व इतर क्लासेस बुडवून प्रेमीयुगल झाडाच्या आडोशाला गुटरगू करत बसल्याचे दिसत आहे. तर अनेक मद्यपी या वास्तूच्या परिसरात मद्य प्राशन करत बसलेले दिसतात. या परिसरात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेट पॉकेट, प्लास्टिक पिशव्यांचे ढीग दिसत आहेत.