Fri, Jun 05, 2020 13:07होमपेज › Satara › वाई : मकरंद पाटील यांच्यापुढे आव्हान

वाई : मकरंद पाटील यांच्यापुढे आव्हान

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 21 2019 8:52PM
यशवंत कारंडे

वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली असून, राष्ट्रवादीची जिल्ह्यात झालेली वाताहत पाहता आ. मकरंद पाटील यांची राजकीय कारकीर्दच या विधानसभेला पणाला लागणार असून, ही निवडणूक त्यांच्यासाठी खडतर ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेने भाजपला या मतदार संघात चांगलेच बळ मिळाले असून, या विधानसभेला भाजप आणि राष्ट्रवादीतच टफ फाईट पहायला मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ते सध्या भाजपच्या राजकारणात सक्रियही झाले असून, भाजपच्या माध्यमातून त्यांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली आहे. नुकताच उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश झाल्याने त्यांचा वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदार संघातील राष्ट्रवादीचा चाहता गट भाजपमध्ये जाणार आहे. त्यामुळे मदन भोसले यांची ताकद आणखी वाढली असल्याचे चित्र दिसून येते.

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची पडझड सुरू झाली. तात्यांचा शब्द जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते टाळत नव्हते. तात्यांमुळे जिल्ह्यात व वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघात राष्ट्रवादीचे पूर्ण वर्चस्व होते. पण, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना न जुमानता त्यांची खास मंडळीही भाजपमध्ये गेली आहेत.  आ. मकरंद पाटील यांचा या मतदार संघात व्यक्तिगत करिष्मा आहे. सत्ता नसताना केलेली विकासकामे, सामान्य जनतेच्या संकटात धावून जाण्याची वृत्ती, केवळ निवडणुकीपुरते जनमानसात न थांबता कायम लोकांमध्ये राहण्याची परंपरा या आ. मकरंद पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, आनंदराव शेळके-पाटील, नितीन भरगुडे-पाटील, रमेश धायगुडे-पाटील, कुमार शिंदे अशा नेत्यांनी त्यांची सोडलेली साथ, बकाजीराव पाटील, शंकरराव गाढवे, बाळासाहेब बागवान, किसनशेठ शिंदे या ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केलेले विरोधी काम, ऐनवेळी उदयनराजेंच्या शब्दाखातर शशिकांत पिसाळ घेणार असलेली भूमिका याबाबी मकरंद पाटील यांच्यासाठी अडचणीच्या आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत आ. मकरंद पाटील 40 हजार 700 च्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांना 1 लाख 212 मते मिळाली होती तर काँग्रेसचे मदन भोसले यांना 62 हजार 516 मते पडली होती. पुरुषोत्तम जाधव (भाजप) यांना 25 हजार 255 मते पडली होती. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर (शिवसेना) यांना 23 हजार 343 मते मिळाली होती. अन्य सहा उमेदवार दीड ते दोन हजारांचा टप्पा गाठू शकले होते. वंचित आघाडी, मनसे, रिपाइंसह अनेक अपक्ष या मतदार संघात लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे काँग्रेसमध्येच राहणार की अन्य पक्षात जाणार? याबाबत चर्चा सुरू आहे. विराज शिंदे यांनीही आपला गट बांधला असल्याने तेही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना आपला हा पारंपरिक मतदार संघ सोडणार नाही, तर भाजप नेते मदन भोसले यांच्यासाठी हा मतदार संघ सुटावा, यासाठी स्वत: मुख्यमंत्री मित्रपक्षाकडे आग्रही भूमिका धरणार. त्यामुळे युतीत जागेवरून वाद उफाळणार आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेतून जोरदार तयारी केली असून, खंडाळा तालुक्याचे जनमत पाठीशी उभा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या मतदार संघातील खंडाळा तालुक्यावर रामराजेंचा असलेला प्रभावही निर्णायक ठरणार आहे.