Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › Satara › भाग्यश्रीच्या खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

भाग्यश्रीच्या खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

Published On: Feb 12 2019 1:09AM | Last Updated: Feb 11 2019 9:21PM
तळमावले : वार्ताहर

करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री संतोष माने या युवतीच्या खुनाबद्दल तिचे वडील संतोष वसंत माने यास ढेबेवाडी पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. या हत्या प्रकरणाला वीस दिवस उलटून गेले तरी खुनाच्या नेमक्या कारणापर्यंत पोलिस अद्याप पोहोचलेले नाहीत. 

संतोष  माने सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संतोष मानेकडून या खुनासंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे मिळतील. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये त्याने वेगवेगळी माहिती पोलिसांना दिली आहे. त्याच्याकडून दृश्यम चित्रपटाप्रमाणे नसलेली दृश्ये निर्माण केली जात आहेत का?  खरी माहिती लपवून इतर नसलेल्या गोष्टींचा तो आभास निर्माण करत आहे. संतोष मानेचा कोणी मास्टरमाइंड आहे का? संतोष मानेचा प्रत्यक्ष खुनामध्ये सहभाग आहे का? सहभाग असेल तर नेमके हत्येचे कारण काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

खुनासंदर्भात संतोष मानेकडे अशी कोणती तरी माहिती आहे जी तो पोलिसांना सांगत नाही. भाग्यश्री मानेची अतिशय क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे. कुटुंबाभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. ज्या कोणी संशयितांनी हत्या केली आहे त्याने अतिशय थंड डोक्याने हत्या केली आहे. संतोष मानेच्या कुटुंबातील सदस्यांची पोलिसांनी वेळोवेळी चौकशी केली आहे. खूनाचा तपास ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. उत्तम भजनावळे करीत आहेत.