Fri, Jul 19, 2019 18:41होमपेज › Satara › मारहाण करून युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

मारहाण करून युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:17PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

घरात जाऊन पाणी मागितले म्हणून खोटा बदनामीकारक आळ घेऊन युवकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संबंधित युवकाने वांग नदीवरील बंधार्‍यातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. दरम्यान, युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोतले (ता. कराड) येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

संग्राम नंदकुमार गरुड (रा. येणके, ता. कराड), सौ. मनिषा राजाराम पाटील (रा. पोतले) व आमाराम रामचंद्र गरुड (रा. येणके) यांच्यावर युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  यापैकी संग्राम गरुड यास पोलिसांनी अटक केली आहे. तर अनिल आनंदा पाटील (वय 22, रा. पोतले, ता.कराड) असे आत्महत्या केलेल्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगळवार दि. 12 रोजी सकाळी अनिल  हा मनिषा पाटील हिच्या घरी पाणी मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिने संग्राम गरुड याला बोलावून घेतले. संग्राम तेथे आल्यानंतर त्याने अनिलला काठीने मारहाण केली. त्यानंतर दुपारी घरी जाऊन घडलेला प्रकार आईस सांगितला व अनिल पुन्हा बाहेर पडला. त्यानंतर संग्राम व आमाराम  गरुड यांनी ओमनी गाडीतून अनिलला कोळे बाजूकडे नेले. रात्री उशीरापर्यंत अनिल घरी आला नाही. म्हणून नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अनिल बेपत्ता असल्याची फिर्यादही नातेवाईकांनी पोलिसात दिली आहे.  

दरम्यान, शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी पोतले गावच्या हद्दीत वांग नदीवरील बंधार्‍यातील पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता तो अनिलचा असल्याचे आढळून आले.  याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबतची फिर्याद आनंदा शामराव पाटील यांनी कराड तालुका पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये खोटा व बदनामीकारक आळ अनिलवर घेतल्यानेच त्याने बंधार्‍यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे बदनामी व मारहाण करत अनिल याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संग्राम, मनिषा व आकाराम यांच्यावर गन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भापकर करत आहेत.